होमपेज › Sangli › नांगरे-पाटील, शिंदे, काळेंवर गुन्हा दाखल करा

सांगली : नांगरे-पाटील, शिंदे, काळेंवर गुन्हा दाखल करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळेला खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याच्यावर थर्ड डिग्रीचा वापर करून पोलिसांनी म्हणजेच शासनाने कट रचून त्याचा खून केला. याला वरिष्ठ अधिकार्‍यांचा कामातील हलगर्जीपणाही कारणीभूत आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशा मागणी कोथळे कुटुंबियांनी बुधवारी केली. तसे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील, तत्कालीन पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्यावर  फौजदारी गुन्हा दाखल करा. अन्यथा 11 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. तरी सुद्धा न्याय न मिळाल्यास कार्यालयासमोरच सामुदायिक आत्मदहन करू, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. 

निवेदनात म्हटले आहे, सांगलीकरांनी पोलिसांची चूक पोटात घ्यावी, असे नांगरे- पाटील म्हणत आहेत. मात्र खोट्या गुन्ह्यात अडकवून,  अमानुष मारहाण करीत अनिकेतचा  खून करण्यात आला.मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला.  त्यामुळे हे राज्य  कायद्याचे आहे का? गृहमंत्री केव्हा जागे होणार?पोलिसांची गुन्हेगारी उघड होऊनही नांगरे पाटील गुन्हेगारी करणार्‍ या पोलिसांना पाठीशी घालत असतील आणि त्यांना मदत  करीत असतील तर या प्रकरणाचा तपास वस्तुनिष्ठ आणि प्रामाणिकपणे होऊ शकणार नाही.

नांगरे-पाटील तपासात हस्तक्षेप करू शकतात. त्यामुळे या प्रकरणाचा तपास निवृत्त न्यायाधीश, निवृत्त सक्षम पोलिस अधिकारी, अप्पर पोलिस महासंचालक यांच्याकडे द्यावा.   प्रथम फिर्याद ही पोलिस निरीक्षकांनी ऐकीव माहितीवर दिलेली आहे. त्यामुळे तो गुन्हा कमजोर ठरू शकतो. मृतदेहाचा पंचनामा करून  का फिर्याद दिली गेली नाही, याचा तपास व्हावा.  

गृहराज्यमंत्री, अतिरिक्त पोलिस महासंचालक बिपिन बिहारी यांनी ज्यांचा कामात हालगर्जीपणा झाला आहे, त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. तरी सुद्धा नांगरे पाटील असे वक्तव्य करीत असतील तर  त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी. अनिकेत पळून गेल्याची खोटी कागदपत्रे तयार करणार्‍या डॉ. काळे यांच्यावर का कारवाई झालेली नाही? संबंधीत अधिकार्‍यांपासून अजूनही जनतेला धोका असल्याने त्यांना यापुढे पदभार देऊ नये. अनिकेतला अटक केल्यानंतर कुटुंबियांना माहिती दिली का? अनिकेतला कोठडीतून बाहेर काढताना आत ठेवताना पोलिस दप्तरी नोंद आहे का तपासासाठी बाहेर काढताना वरीष्ठांची परवानगी घेतली होती का , गुन्ह्याबाबत तहसठलदार किंवा राज्य मानवी हक्क आयोगाला का कळवले नाही असे मुद्दे निवेदनात मांडण्यात आले आहेत.अनिकेतची पत्नी संध्या, वडील अशोक, आई अलका, भाऊ  आशिष व अमित आणि या दोघांच्या पत्नींच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.