Thu, Sep 24, 2020 09:13होमपेज › Sangli › एकदिलाने लढू; कमळ शिल्लक राहणार नाही : राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम

एकदिलाने लढू; कमळ शिल्लक राहणार नाही : राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम

Last Updated: Jan 23 2020 1:49AM
सांगली : पुढारी वृत्तसेवा
पुरोगामी महाराष्ट्र आणि जिल्ह्यातही चुकांमुळे पिछेहाट सहन करावी लागली. पण आता त्या चुका उगाळत बसण्याची गरज नाही.  विकास महाआघाडीची मूठ अधिक घट्ट करून एकदिलाने लढल्यास जिल्ह्यात कमळ शिल्लकही राहणार नाही, असे प्रतिपादन सहकार, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी केले. येथील स्टेशन चौकात त्यांचा बुधवारी स्वातंत्र्य सैनिकांच्याहस्ते सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

शहरात  जंगी मिरवणूक काढून सत्कार केल्याने पुन्हा काँग्रेसचे जुने दिवस जनतेच्या आठवणीत आणल्याबद्दल त्यांनी आभार मानले. पालकमंत्री व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या साथीने जिल्ह्याच्या आणि शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. जिल्ह्याचा कायापालट करू, अशी ग्वाहीही  त्यांनी दिली. 

आमदार विक्रमसिंह सावंत, जयश्री पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवानेते विशाल पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, मनपातील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, माजी महापौर हारुण शिकलगार, नगरसेवक अभिजित भोसले, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, नगरसेवक संतोष पाटील, फिरोज पठाण, मनोज सरगर, प्रकाश मुळके, युवानेते अमर निंबाळकर, मयूरशेठ पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे, प्रा. पद्माकर जगदाळे, शिवसेनेचे रावसाहेब घेवारे, बजरंग पाटील, नगरसेविका रोहिणी पाटील, वर्षा निंबाळकर,  कांचन कांबळे, शुभांगी साळुंखे, वहिदा नायकवडी, अ‍ॅड. अजित सूर्यवंशी, नितीन गोंधळे, अजित दुधाळ, अमित पारेकर, आदींसह पदाधिकारी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

डॉ. कदम म्हणाले, डॉ. पतंगराव कदम, आर. आर. पाटील, मदन पाटील  यांच्या जाण्याने जिल्ह्याची मोठी हानी झाली. त्यामुळे काँग्रेसचे काय होणार अशी अवस्था झाली होती.  जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी माझ्याकडे अपेक्षा ठेवल्या. परंतु पलूस-कडेगावमध्ये डॉ. कदम यांनी जे 40 वर्षांत लोकांसाठी केले त्या कार्याचा वारसा तेथून जपून पुढे जिल्हा आणि राज्यात नेण्याची सुरुवात मी केली. 

ते म्हणाले, विरोधी आमदार म्हणून सक्षमपणे काम करायचे ठरविले होते. सुदैवाने राज्यात जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ततेसाठी विकास महाआघाडी सत्तेवर आली. महापूर, अतिवृष्टी, दुष्काळासारखी अनेक संकटे आली होती. परंतु मागील सरकारने काही केले नाही. मात्र, महाआघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून दोन लाख रुपये कर्जमाफी देऊन शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. सर्वच पक्षांनी एकत्र येऊन आता याच पद्धतीने जिल्ह्यात आणि शहराच्या विकासाचा धडाका लावू. महापालिकेच्या प्रश्‍नांसंदर्भात लवकर बैठक घेऊ. 

जयश्री पाटील म्हणाल्या, डॉ. पतंगराव कदम यांची जनसामान्य व  गोरगरीबांबद्दलची तळमळ आणि विकासाचा वारसा डॉ. विश्‍वजित कदम सक्षमपणे पुढे चालवतील. विशाल पाटील म्हणाले, विश्‍वजित यांनी गोरगरीब, कष्टकर्‍यांसाठी तब्बल 20-22 वर्षे संघर्ष करून हे यश मिळविले आहे. त्यांच्यारूपाने काँग्रेसला मंत्रिपद मिळाले. आजच्या ऐतिहासिक सत्कारामुळे जिल्हा पुन्हा एकदा काँग्रेसमय झाला आहे. पृथ्वीराज पाटील प्रास्ताविकात  म्हणाले, डॉ. विश्‍वजित कदम यांच्यारूपाने आता नव्या विकासपर्वाची सुरुवात झाली आहे. पुन्हा जिल्ह्यात काँग्रेसला गतवैभव प्राप्त होईल. उत्तम साखळकर यांनी आभार मानले. 

डॉ. विश्‍वजित, विशाल यांची टोलेबाजी
विशाल पाटील आपल्या नेहमीच्या शैलीत म्हणाले, ‘स्व. डॉ. पतंगराव कदम हे आंब्याचे झाड होते. त्यांच्या सावलीखाली अनेकजण वाढले. त्यांनी गोड फळे दिली. पण आम्ही झाडाला खालून दगड मारत होतो. याबद्दल स्व. डॉ. कदम यांनी मला ‘तुझा राजकीय गुरू कोण’ असे विचारलेही होते. त्यावेळी तुमचे सुपुत्र डॉ. विश्‍वजितच माझे गुरू असल्याचे मी सांगितले होते. त्यांच्याप्रमाणे तुम्हीही आंब्याचे झाड आहात. आम्ही कधी खालून दगड मारू. पण सध्या कैर्‍या देता, पुढे गोड रसाळ आंबे द्या. तोच धागा पकडून डॉ. विश्‍वजित म्हणाले, विशालराव, आता यापुढे तरी असे दगड मारायचे बंद करा. वर दगड मारता, परत तो तुमच्यावरच पडतो. तुम्ही मला गुरू केले. पण माझ्याकडून जे शिकायला हवे होते ते न शिकता कॉपी करून वेगळेच शिकलात. या त्यांच्या टोलेबाजीवर उपस्थितांत हशा पिकला.

महाराष्ट्रात ‘सीएए’ उधळून लावू 
सत्कार सोहळ्याच्या जवळच ‘सीएए’ कायद्याच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे पहिल्यांदा डॉ. कदम यांनी तेथे जाऊन त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यासंदर्भात सभेत ते म्हणाले, ‘सीएए’ कायद्याविरोधात मुस्लिम बांधव कुटुंबीयांसमवेत आंदोलन करीत आहेत. परंतु हा कायदा केवळ त्यांच्याच नव्हे तर सर्व जाती-धर्मांना घातक आहे. केंद्र सरकार लोकशाहीला मारक असून जाती-धर्मात विषवल्ली रुजवत आहे. त्याविरोधात देशभरात विरोध सुरू आहे. आंदोलने, मोर्चे सुरू असूनही हुकूमशाही पद्धतीने हा कायदा लागू करण्यासाठी आटापिटा सुरू आहे.  पण राज्यात छत्रपती शिवराय, फुले, शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही ‘सीएए’ कायदा अंमलात आणणार नाही. जनतेवर अन्याय करणार नाही.

 "