Sun, Mar 29, 2020 07:56



होमपेज › Sangli › अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही : विश्वजीत कदम

अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही : विश्वजीत कदम

Last Updated: Mar 26 2020 6:47PM

सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम



सांगली :  पुढारी वृत्तसेवा           

कृषी माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना पासेस देण्यात येतील. जिल्ह्यात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. द्राक्ष, फळे, भाजीपाला आदींच्या बाबतीत अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. वाहतूक सुरळीत चालू राहील याबाबत प्रशासन सर्वोतोपरी काळजी घेत आहे, असे प्रतिपादन सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा बैठक बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ.कदम म्हणाले, येणाऱ्या काही दिवसांत नागरिकांना नाईलाजाने थोडा त्रास सोसावा लागेल. परंतु हा त्रास आपल्या कामासंदर्भात असेल, मुलांच्या शाळा, कॉलेजच्या संदर्भातील असेल, परंतु अधिक त्रास आपल्या आरोग्याच्या दृष्टीने होऊ नये यासाठी शासनाने काही निर्णय घेतले आहेत. जिल्ह्यात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. द्राक्ष, फळे, भाजीपाला आदिंच्या बाबतीत अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही व वाहतूक सुरळीत चालू राहील याबाबत प्रशासन सर्वोतोपरी काळजी घेत आहे. 

तसेच जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंची पुरेसी उपलब्धता आहे. त्यामुळे नागरिकांनी साठा करू नये. त्याचे वाटपही येणाऱ्या काळामध्ये सुरळीत सुरू राहील. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. कलम १४४ सुरू असून त्याची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा, प्रशासन यंत्रणा सर्वजणच या बिकट परिस्थितीत झोकून देवून काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनातर्फे देण्यात येणाऱ्या निर्देशांची पायमल्ली करून घराबाहेर पडू नये, असे आवाहन डॉ.कदम यांनी केले आहे.  

कोरोना या मोठ्या संकटाला मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. जिल्ह्यात ९ रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. या सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे कोणीही पॅनिक होऊ नये, घाबरू नये, असे आवाहनही डॉ.कदम यांनी यावेळी केले. 

शेतीमालाच्या वाहतूकीत कोणताही अडथळा होऊ नये यासाठी राज्य व केंद्र शासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच प्रशासनानेही याबाबत अंमलबजावणी सुरू केली आहे. तहसिलदार स्तरावर अशा कृषी माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना पासेस देण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासन करत असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.

डॉ.कदम पुढे  म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबईहून आपआपल्या गावाकडे येणाऱ्या लोकांबाबत स्थानिक नागरिकांनी मनात भिती बाळगू नये. ताप, सर्दी, खोकला अशी काही लक्षणे लोकांमध्ये आढळल्यास त्यांनी तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. जिल्हा प्रशासनाने अत्यंत चांगले नियोजन केले आहे. जिल्हा प्रशासन आरोग्य सुविधेच्या दृष्टीने सुसज्ज झाले आहे. येईल त्या परिस्थितीला सामोरे जाऊन सामोपचाराने यातून मार्ग काढावयाचा आहे. 

डॉ.कदम म्हणाले, मास्क, सॅनिटायझर, जीवनावश्यक वस्तू यांची जास्त किंमतीने विक्री करून नये. तसे कोणी करत असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. खासगी डॉक्टर्स यांनी त्यांची हॉस्पीटल, दवाखाने लोकांसाठी उघडीच ठेवावी यासाठी राज्य शासनाने कडक धोरण अंवलबिले आहे. त्यामुळे नैतिकतेच्या दृष्टीकोनातूनही खासगी डॉक्टर्स यांनी आपले दवाखाने लोकांच्या आरोग्य सेवेसाठी सुरूच ठेवले पाहिजेत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. भारती हॉस्पिटलकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक यंत्रणा, मनुष्यबळ, निधी याबाबत सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असा दिलासाही राज्यमंत्री डॉ. कदम यांनी यावेळी दिला.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांच्यासह आरोग्य विभागाचे व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.