Mon, Nov 30, 2020 14:07होमपेज › Sangli › मनपाच्या वीज बिलात ३२ लाखांचा अपहार

मनपाच्या वीज बिलात ३२ लाखांचा अपहार

Last Updated: Nov 22 2020 11:58PM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या स्ट्रीट लाईटच्या वीज बिलात तब्बल 31 लाख 83 हजार 510 रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी एक पतसंस्था, एक बँक आणि महावितरणचा एक कर्मचारी अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्युत अभियंत्याच्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्था, एम. डी. पवार पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अधिकारी, कर्मचारी, महावितरणचा कंत्राटी कर्मचारी ज्ञानेश्वर सदाशिव पाटील (वय 29, रा. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महापालिकेचे विद्युत अभियंता अमरसिंह वसंतराव चव्हाण (48, रा. मिरज) यांनी फिर्याद दिली आहे. 

महापालिकेकडून धनादेशाद्वारे वीज बिल भरले जाते. महावितरण कंपनीच्या अधिकृत भरणा केंद्रात वीज बिलाचे धनादेश जमा केले जातात. ते धनादेश महावितरणचा कर्मचारी ज्ञानेश्वर सदाशिव पाटील जमा करत होता. महापालिकेकडून त्याने मे 2019 ते जून 2020 या काळात वीज बिलाचे धनादेश घेतले. त्यानंतर महापालिकेकडे असलेल्या ग्राहक यादीत फेरफार केला. तसेच महापालिकेकडून बिलाचा धनादेश घेऊन तो त्या दोन संस्थांमध्ये भरला मात्र महापालिकेकडे नोंद नसलेले घरगुती, वाणिज्य, औद्यागिक ग्राहकांची ग्राहक क्रमांक, नावे घालून देयके तयार केली आणि महापालिकेच्या पैशांतून त्यांची वीज बिले भरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  

वीज बिलाचे धनादेश वसंतराव चौगुले पतसंस्था, एम.डी. पवार बँक येथे जमा केले. यामध्ये महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. सर्व संशयितांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमताने स्ट्रीट लाईटच्या बिलाचा भरणा न करता 31 लाख 83 हजार 510 रूपयांचा अपहार करून महापालिकेची फसवणूक केल्याचे चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

त्यानुसार तिघाही संशयितांविरोधात फसवणूक, अपहार केल्याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बागाव अधिक तपास करत आहेत.

मासिक 70 लाखांचा वीज बिल भरणा

सांगली, मिरज व कुपवाड शहरात स्ट्रीटलाईट आहेत. त्यासाठी सांगलीच्या दक्षिण, पश्चिम, पश्चिम  मध्य, उत्तर, माधवनगर आणि मिरज अशा सहा झोनमधून 431 मीटर्समार्फत वीजपुरवठा होतो. त्याद्वारे होणार्‍या मीटरचे बिल वार्षिक आठ कोटी रुपयांच्या घरात आहे. म्हणजेच मासिक 70-72 लाख रुपयांचे बिल महापालिका भरते.