Sun, Sep 20, 2020 06:57होमपेज › Sangli › सांगली : तब्बल ५५ कोरोना रुग्णांच्या बिलात घोळ

सांगली : तब्बल ५५ कोरोना रुग्णांच्या बिलात घोळ

Last Updated: Aug 14 2020 1:12AM
सांगली ः पुढारी वृत्तसेवा

कोरोना रुग्णावर उपचार केलेल्या रुग्णालयाच्या बिलांची तपासणी करण्यासाठी लेखा अधिकार्‍यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाने केलेल्या तपासणीत ७२ पैकी ५५ बिलात घोळ करुन ३ लाख २१ हजार रूपयांची तफावत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. ही रक्कम तातडीने परत देण्याचे आदेश दिले आहेत. 

अधिक वाचा : सांगलीत पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

दरम्यान रूग्णालयांनी औषधाच्या व तपासणीच्या पावत्या सादर न केल्याने ५ लाख ९१ हजार रूपयांच्या बिलाबाबत निर्णय प्रलंबित ठेवला आहे. लेखाबिलातील अनियमतेबाबत विविध रूग्णालयांना १८ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

कोरोना उपचारासाठी अधिग्रहित केलेल्या हॉस्पीटलकडून आकारण्यात येणार्‍या बिलांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शासनमान्य दराने बिलाची आकारणी केल्याबाबतची खात्री करण्यासाठी लेखा अधिकार्‍यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे. विविध रूग्णालयांतील या पथकाने आतापर्यंत ७२ बिलांपैकी ५५ देयकांमध्ये तफावत आढळून आली आहे. 

अधिक वाचा : ‘पाच हजार पार’; जिल्ह्यात नवे 130 पॉझिटिव्ह

याबाबत भारती हॉस्पीटल, कुल्लोळी हॉस्पीटल, मिशन हॉस्पीटल, घाडगे हॉस्पीटल, सेवासदन व मेहता हॉस्पीटल यांना विविध प्रकरणी १८ नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पथकाने नर्सिंग, आयसोलेशन, आयसीयू आणि रूमचे भाडे, कन्सल्टेशन, विविध चाचण्या, ऑक्सिजन, औषधे आदींच्या शुल्क आकारणीबाबत काटेकोरपणे तपासणी करीत आहे.   

आतापर्यंत ३० लाख ४५ हजार रूपयांच्या ७२ देयकांची तपासणी केली. यामध्ये ५५ बिलामध्ये ३ लाख २१ हजार ५६५ रुपयांची तफावत आहे. त्याशिवाय ५ लाख ९१ हजार १४९ रूपयांच्या बिलात घोळ आहे. रुग्णालयांना नोटीसा काढल्या असून ज्यांचा खुलासा समाधानकारक नाही आणि अतिरिक्त बिलाची रक्कम जी रूग्णालये रूग्णांना परत करणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. तपासणीनंतरच रुग्णाकडून बिल घ्यावे असे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे. 

अधिक वाचा : कोरोनापुढे माणुसकीच्या भिंतीही ढासळल्या

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, रूग्णालयांनी  आकारलेली बिलाची खात्री करण्यासाठी लेखा अधिकार्‍यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे. हॉस्पिटलनी उपचार केल्याबाबतचे पक्के बिल तीन प्रतीत तयार करून त्याची एक प्रत लेखा तपासणी अधिकारी यांना डिस्चार्जपूर्वी तपासणीसाठी सादर करावी.  छाननी केल्यानंतरच अंतीम रक्कम रूग्णाकडून घ्यावी. यामध्ये  कुचराई केल्यास  कारवाई करण्यात येईल असे चौधरी यांनी सांगीतले आहे.

 "