Tue, Oct 20, 2020 11:56होमपेज › Sangli › दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Last Updated: Oct 18 2020 12:18AM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

चार-पाच दिवस पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात किमान दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. द्राक्ष, डाळिंब, ज्वारी, भुईमूग, उसाला मोठा फटका बसला आहे. लवकरच पंचनामे सुरू होणार असल्याचे कृषी खात्याने सांगितले आहे. त्यामुळे नुकसानीच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

पश्चिम भागातील शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यातील ऊस, केळी अशी  पिके भुईसपाट झाली आहेत. ज्वारी, सोयाबीन भिजल्याने शेतातच कुजू लागले आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागातील तासगाव, कवठेमहांकाळ तालुका व मिरज पूर्व भागातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. तसेच खरीप पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. 

आटपाडी, खानापूर तालुक्यातील डाळिंब बागांत मोठ्या प्रमाणात फूल व फळांची गळ झाली आहे. काही ठिकाणी जमीन खचली, वाहून गेली आहे. भाजीपाला शेतातच कुजला आहे. अनेक ठिकाणी हरितगृहांचेही नुकसान झाले आहे. मका, सोयाबीन, बाजरी पूर्णत: पाण्यात भिजली आहे.  कृषी विभागाच्या प्राथमिक नजर अंदाजानुसार 629 गावांतील 20 हजार शेतकर्‍यांचे आठ ते दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

हा पहिल्या टप्प्यातील अंदाज आहे. प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे हा आकडा आणखी पाच हजार हेक्टरंनी वाढू शकतो. एकूण नुकसानीचे क्षेत्र 15 ते 20 हजार हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

खरीप पिकांचे तसेच ऊस, डाळिंब आणि द्राक्षे अशा बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम द्राक्षे आणि डाळिंबाच्या उत्पादनावर होणार आहे. भात, सोयाबीन, ज्वारी आणि भाजीपाल्याचे नुकसान झाल्यामुळे त्यांचे उत्पादन कमी येणार आहे. त्याचा थेट फटका शेतकर्‍यांना बसणार आहे. 

कांदा, आले यासह भाजीपाल्याचे पीक शेतातच कुजले आहे. त्यामुळे आणखी दोन-तीन महिने तरी भाजीची टंचाई स्थानिक बाजारपेठेत जाणवणार आहे. शेतात पाणीच पाणी झाल्यामुळे अनेक ठिकाणी ऊस, भात भुईसपाट  झाले आहे. आणखी किमान महिनाभर तरी अनेक ठिकाणी फडातील पाणी हटण्याचे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे कारखान्यांना ऊसतोड करणेही कठीण जाणार आहे. अंतिमतः त्याचा फटका शेतकर्‍यांनाच बसणार आहे. 

पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. त्यांनी शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही दिली आहे. आ. अनिल बाबर, आ. सुधीर गाडगीळ, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुणअण्णा लाड यांनी शेतकरी, नागरिक तसेच व्यावसायिकांनाही शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. शासन आता मदतीसाठी कोणता निर्णय घेते याकडे शेतकर्‍यांचे लक्ष आहे. 

 "