Fri, Sep 18, 2020 18:51होमपेज › Sangli › इस्लामपुरात चार हजार जणांची तपासणी

इस्लामपुरात चार हजार जणांची तपासणी

Last Updated: Mar 26 2020 11:57PM
इस्लामपूर: पुढारी वृत्तसेवा 

शहरातील कोरोना संसर्गाचे रुग्ण सापडलेल्या परिसरातील 850 घरांतील सुमारे चारर हजार जणांची तपासणी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. आरोग्य विभागाची दहा पथके शहरात कार्यरत आहेत. होम क्‍वारंटाईनमधील 27 जण आरोग्य  विभागाच्या निरीक्षणाखाली आहेत. त्यांच्यामध्ये सध्या तरी कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी सांगितले. 

कारोनाबाधित चौघांच्या संपर्कात आलेल्या  13 पैकी बुधवारी  5  जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, तर  8 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. संसर्ग झालेल्यांची प्रकृतीही स्थिर आहे. हे   शहराच्या दृष्टीने दिलासादायक वृत्त आहे. होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या 27 जणांच्या स्वॅबचा  अहवाल आज शुक्रवारी येणार आहे.या 27 जणांच्या संपर्कातील इतरांनाही होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

सौदी अरेबियाहून   आलेल्या येथील  एकाच कुटुंबातील चौघाजणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सोमवारी वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले होते. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली  होती.  या कुटुंबाशी संबंधित आणखी 13 जणांना  आयसोलेशन मध्ये पाठविण्यात आले होते. तर त्यांच्या संपर्कातील 27 जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.  आयसोलेशनमधील 13 पैकी आणखी 5  जणांना  कोरोनाचा संसर्ग झाल्याचे बुधवारी वैद्यकिय तपासणीतून स्पष्ट  झाले. उर्वरित 8 जणांची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली आहे. दरम्यान कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या परीसरातील 850 घरातील चार हजार जणांची तपासणी आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. आरोग्य विभाची 10 पथके शहरात कार्यरत आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:हून आपत्कालीन कक्षाशी संपर्क  साधावा असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

दरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालीका , प्रशासन, आरोग्य विभाग प्रयत्नांची शिकस्त करत आहेत.  यावर करावयाच्या उपाययोजनावर चर्चा करण्यासाठी पालीकेत रात्री उशीरापर्यंत नगराध्यक्ष निशिकांत पाटील, उपनगराध्यक्ष दादासो पाटील मुख्याधिकारी प्रज्ञा पवार राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे नगरसेवक वैभव पवार व अधिकार्‍यांची बैठक सुरु होती.

इस्लामपूर शहरातील कोरोनाची साथ तालुक्यात पसरु नये याचीही संपूर्ण खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. गावनिहाय कमिट्या नेमून योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
 

 "