Fri, Sep 18, 2020 19:48होमपेज › Sangli › इस्लामपूर येथे लहान मुलास कोरोना

इस्लामपूर येथे लहान मुलास कोरोना

Last Updated: Mar 29 2020 10:48PM
सांगली/इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

इस्लामपूर येेथील आणखी एकास कोरोनाची बाधा झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले.  हा रुग्ण त्याच कुटुंबातील दोन वर्षाचा लहान मुलगा असल्याचे समजते, तर दोघांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 24 झाली आहे. 

सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण मंगळवार, दि. 24 रोजी सापडले. इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. यानंतर या चारजणांशी संबंधित 39 लोकांना तातडीने अलगीकरण कक्षात ठेवले होते.     

 त्यातील कोरोनाची लक्षणे दिसणार्‍यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले  होते. बुधवारी पाचजणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. गुरुवारी त्यात आणखी तीन जणांची भर पडली. शुक्रवारी आणखी 12 जण कोरोनाग्रस्त असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. 

हे सर्वजण एकाच कुटुंबातील व नातेवाईक आहेत. यामुळे रुग्ण संख्या एकदम 23 वर पोहोचली. या रूग्णांच्या संपर्कात आलेली व त्यांची नातेवाईक असलेली कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगावच्या एका महिलेचा रिपोर्टही पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे राज्यात शेवटच्या क्रमांकावर असलेला जिल्हा तिसर्‍या क्रमांकावर गेला. मोठ्या संख्येने रुग्ण सापडल्याने अवघा जिल्हा हादरून गेला. या सर्वांवर मिरजेत शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

या नव्या रुग्णांच्या संपर्कात आलेले अजून कितीजण बाहेर वावरत आहेत, याचा शोध प्रशासन घेत आहे.  सुमारे 400 हून अधिकजणांची यादी काढून त्यांची तपासणी सुरु आहे. अनेकांच्या घशातील स्वॅबचे नमुने घेवून तपासणीसाठी पुण्याला पाठविले जात आहेत. 

 "