Mon, Aug 10, 2020 04:55होमपेज › Sangli › जयंत पाटील  मंजूर योजनांचे श्रेय लाटतात : खोत 

जयंत पाटील  मंजूर योजनांचे श्रेय लाटतात : खोत 

Published On: Aug 05 2018 1:33AM | Last Updated: Aug 04 2018 10:43PMइस्लामपूर : वार्ताहर

राष्ट्रीय पेयजल योजनेतून आम्ही राज्यात 6 हजार पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिली आहे. यासाठी 5 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेतून हातकणंगले मतदारसंघात 225 कोटींच्या 176 तर सांगली जिल्ह्यात 466 कोटींच्या 226 योजना मंजूर केल्या असल्याची माहिती कृषी व पाणीपुरवठा राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली. आम्ही मंजूर केलेल्या वाळवा तालुक्यातील योजनांचे श्रेय आमदार जयंत पाटील लाटत आहेत. 15 वर्षे मंत्री असताना त्यांनी या योजना का मंजूर केल्या नाहीत, असा  सवालही ना. खोत यांनी यावेळी केला. 

गेल्या 10 ते 15 वर्षांत पाणीपुरवठा योजनांच्यासाठी जिल्ह्यात एवढा मोठा निधी कधीच आला नाही, असेही ते म्हणाले. ना. खोत म्हणाले,   जयंत पाटील यांनी या योजनांसाठी निधी आणला असेल तर  तो वर्षभरापूर्वी का आणला नाही? मी पाणीपुरवठा राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम जिल्हा व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला प्राधान्य देऊन निधी मंजूर करून आणला. पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडिक व माजी जि.प. सदस्य सम्राट महाडिक यांनी तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचे सविस्तर प्रस्ताव दिले होते. ते सर्व मंजूर केले आहेत. 

ते म्हणाले, आत्तापर्यंत राज्यात 6 हजार पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. यासाठी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. मार्चपर्यंत या योजनांसाठी 2 हजार कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहोत.  सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात 23, हातकणंगले-21, शाहुवाडी-33, पन्हाळा-43, शिराळा- 23, वाळवा-33 एवढ्या पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. सर्वांत मोठी योजना वाळवा तालुक्यातील पेठ येथील 15 कोटींची आहे. 

ते म्हणाले, आता या योजनांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न  जयंत पाटील करीत आहेत. मात्र योजना कुणी मंजूर केल्या हे सर्व जनतेला माहीत आहे. पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडिक, माजी जि.प. सदस्य सम्राट महाडिक, पक्षप्रतोद विक्रम पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष भास्कर कदम, जि.प. सदस्य जगन्नाथ माळी, जयवंत पाटील उपस्थित होते.

त्यांना उद्घाटनाची घाई...

जयंत पाटील यांना 15 वर्षांत स्वत:च्या गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करता आली नव्हती.कासेगावसाठी 6 कोटी रुपये आम्ही दिले आहेत. आता आम्ही मंजूर केलेल्या योजनांचे उद्घाटन करण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. त्यांना उद्घाटनाची घाई झाली आहे. आम्ही मात्र उद्घाटनासाठी नव्हे ;तर जनतेला स्वच्छ पाणी मिळावे या हेतूने या योजना मंजूर करून आणल्या आहेत. आम्हाला उद्घाटनाची हौस नाही, असेही ना. खोत यांनी सांगितले.