Wed, Aug 12, 2020 09:24होमपेज › Sangli › उपसूचनेद्वारे ३४ आरक्षणे उठवण्याचे प्रस्ताव रद्द

उपसूचनेद्वारे ३४ आरक्षणे उठवण्याचे प्रस्ताव रद्द

Published On: Feb 27 2018 1:57AM | Last Updated: Feb 27 2018 12:02AMसांगली : प्रतिनिधी

फेब्रुवारीच्या महासभेत उपसूचनांद्वारे मोक्याच्या जागांवरील तब्बल 34 आरक्षणे उठविण्याचे प्रस्ताव  रद्द केले आहेत, असे महापौर हारुण शिकलगार यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत सांगितले. काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी विकास आघाडीच्या 18 पेक्षा अधिक नगरसेवकांनी हे प्रस्ताव दिले होते. निवडणुकीच्या तोंडावर सादर केलेले हे प्रस्ताव फेटाळल्याने  संबंधित नगरसेवकांना  झटका बसला आहे.

जानेवारीच्या महासभेत सह्याद्रीनगरजवळील  खोजा समाज वस्तीचे ट्रक पार्किंगचे आरक्षण, संजयनगर तसेच विजयनगरमधील जागांची आरक्षण उठविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यासोबतच अन्य काही जागांवरील घरांची आरक्षणे उठवावीत, अशी नगरसेवकांकडून मागणी होती. 

त्याचा आधार घेऊन काही नगरसेवक, कारभार्‍यांनी आपापल्या प्रभागातील आरक्षणे उठविण्याबाबत महापौरांवर दबाव टाकला होता. त्यासाठी तब्बल 34 आरक्षणांबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपसूचना दिल्या होत्या. याबाबत महासभेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. या वादातून सभाही गुंडाळण्यात आली होती. परंतु प्रस्ताव देणार्‍यांपैकीच काही नगरसेवकांनी आरक्षणे उठवू नयेत, अशी स्टंटबाजीही केली होती. 

या आरोपांचा  शिकलगार यांनी सभा संपताच समाचार घेत आरक्षण उठवण्यासाठी प्रस्ताव देणार्‍यांची यादीच जाहीर केली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे  11 पेक्षा अधिक आणि काँग्रेस व स्वाभिमानीच्या 7 नगरसेवकांचा समावेश होता. त्यांचे प्रस्ताव तपासूनच निर्णय घेणार असल्याचे शिकलगार यांनी सांगितले होते.

आरक्षणे उठविण्याच्या निर्णयाचा  पूर्वीचा ठराव कायम करण्यापूर्वी  शिकलगार यांनी नंतरचे  सर्वच प्रस्ताव रद्द करण्याचे  आदेश प्रशासनाला दिले. ते म्हणाले,   34 जागांवरील आरक्षणे उठवण्याच्या नगरसेवकांच्या सर्व उपसूचना  फेटाळल्या आहेत. या सर्वच जागांचा प्रशासनाने  पंचनामा करावा. त्या आरक्षित जागांवर किती घरे आहेत, किती घरे बाधित होतात, याचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत.  कायदेशीर असेल तरच प्रत्येक आरक्षणांबाबत स्वतंत्र प्रस्ताव सादर करावा, असे सांगितले आहे.