Mon, Sep 21, 2020 23:40होमपेज › Sangli › साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास

साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास

Last Updated: Jan 14 2020 11:16PM
कुपवाड :  वार्ताहर
शहरातील दोन व बामणोलीतील एक अशा तीन ठिकाणचे बंद बंगले  चोरट्यांनी फोडले. या बंगल्यातील 28 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 22 हजार रुपये रोख असा 4 लाख 66 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. चोरीच्या या घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्या.

कुपवाड पोलिस ठाण्यातून देण्यात आलेली  आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः शहरातील रशिदा बाबासाहेब शेख (रा.संभाजी चौक, कापसे प्लॉट) या मुंबईत मुलीच्या सासरी गेल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी त्या गावाला गेल्या होत्या.सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचे कुलूप फोडून आत प्रवेश केला. 

बंगल्यातील दोन्ही बेडरूम मधील लोखंडी तिजोरीचे कुलूप तोडले. तिजोरीतील सोन्याच्या पाटल्या, नेकलेस, कर्णफुले, चार अंगठ्या, रिंग, लहान मुलांच्या अंगठ्या, चांदीच्या बिंदल्या व रोख वीस हजार रुपये असा 2 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

शेख यांच्या घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या मधुकर राजाराम शेडबाळकर यांच्या बंद बंगल्याचे कुलूपही  अज्ञात चोरट्यांनी फोडले. त्यांच्या घरात तिजोरीत ठेवलेले सोन्याचे गंठण, कर्णफुले, दोन चेन, अंगठी, टिक्का, राणीहार, चांदीचे ब्रेसलेट असा 2 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

चोरट्यांनी यानंतर बामणोली मधील भरवस्तीत असलेल्या विष्णू किसन सिंदकर यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील तिजोरी फोडली. परंतु चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. सिंदकर यांच्या बंगल्यातून कसला तरी आवाज आल्याने शेजारी राहत असलेले त्यांचे नातेवाईक जागे झाले. त्यावेळी दोन चोरटे मोटारसायकलवरून जाताना एका महिलेने बघितले. त्या महिलेने “कोण आहे रे”, असा आवाज दिल्यावर चोरट्यांनी “आम्ही पाहुणे आहोत”, असे म्हणून धूम ठोकली.

पोलिसांनी चोरीचा पंचनामा केला आहे. चोरीची माहिती मिळताच मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संदीपसिंह गिल, सहाय्यक पोलिस निरीक्षक निरज उबाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पोलिस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे तपास करीत आहेत.

 "