Thu, Jul 02, 2020 18:47होमपेज › Sangli › नाकाबंदीने गुन्हेगारीत झाली घट!

नाकाबंदीने गुन्हेगारीत झाली घट!

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 8:42PMसांगली : अभिजित बसुगडे

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिवसा आणि रात्री नाकाबंदी सुरू केली आहे. रात्री बारापर्यंत पोलिस रस्त्यावर असल्याने जुलैच्या पंधरवड्यात गुन्हेगारीत चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. दारू पिऊन वाहन चालवणार्‍यांविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केल्याने तळीरामांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे दारूचा खप निम्म्याने घटल्याचे चित्र आहे. तर अपघात आणि मारामार्‍यांनाही चाप बसला आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी पोलिस अधीक्षक शर्मा यांनी नाकाबंदी वाढवली आहे. रात्रीच्या नाकाबंदीसाठी पोलिस ठाण्याकडील एकूण पोलिसांच्या 60 टक्के अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरतील असे आदेश त्यांनी काढले आहेत. सध्या निवडणुका सुरू असल्याने रात्रीच्या नाकाबंदी, गस्तीसाठी कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. मात्र निवडणुकीनंतर ही संख्या वाढविण्याचे संकेत अधीक्षक शर्मा यांनी दिले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे महापालिका क्षेत्रातील गुन्हेगारीत घट झाल्याचे चित्र आहे. 

नाकाबंदीवेळी दारू पिऊन वाहन चालवणार्‍यांविरोधातील कारवाई वाढवल्याने तळीरामांची चांगलीच अडचण झाल्याचे चित्र आहे. पोलिस कारवाईमुळे तळीरामांनी बारमध्ये जाण्याचे टाळल्याने दारूचा खप निम्म्याने कमी झाल्याचे चित्र आहे. त्याशिवाय याचा फटका इच्छुक उमेदवारांनाही बसत आहे. कार्यकर्त्यांची सोय कशी करायची, असा प्रश्‍न इच्छुकांना भेडसावत आहे. त्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याच्या घरीच त्यांना सोय करावी लागत आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकांचेही दारू विक्रीवर लक्ष असल्याने विक्रेत्यांचीही चांगलीच पंचाईत झाली आहे. 

तळीराम रात्री रस्त्यावर नसल्याने किरकोळ अपघात, मारामार्‍या सारख्या घटनाही नगण्य घडत आहेत. केवळ पोलिसांच्या रात्रीच्या नाकाबंदीमुळे शहरातील अनेक गैरकृत्यांना आळा बसला आहे. त्यामुळे केवळ निवडणुकीपुरती नाकाबंदी न करता ती पुढेही सुरू ठेवावी, अशी मागणी सांगलीकरांकडून होत आहे. गुन्हेगारीला आळा बसल्याने पोलिस अधीक्षक शर्मा यांच्या नाकाबंदीच्या निर्णयाचे सांगलीकरांकडून स्वागतच केले जात आहे. 

घरफोड्यांमध्ये लक्षणीय घट...

चोरी, घरफोड्यांसारख्या गुन्ह्यांना केवळ पोलिसच जबाबदार असतात. रात्रीची सुरक्षा पूर्णपणे पोलिसांच्या हाती असते. याची जाणीव ठेवून पोलिस अधीक्षक शर्मा यांनी रात्रीच्या गस्तीसाठी अधिकारी, कर्मचारी वाढवण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून जुलैमध्ये केवळ दोनच घरफोड्या पोलिसांच्या दफ्तरी नोंद आहेत. जूनमध्ये मात्र 20 घरफोड्या नोंद आहेत. रात्री पोलिस रस्त्यावर दिसल्याने घरफोड्यांसारख्या गुन्ह्यात घट होत आहे.

कार्यकर्त्यांच्या ओल्या 

पार्ट्यांनाही लागला चाप...सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात महत्वाच्या 12 ठिकाणी रात्री आठ ते बारा या काळात पोलिसांची रोज नाकाबंदी सुरू असते. या नाकाबंदीवेळी रोज अनेक तळीरामांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे शहराबाहेरील ढाब्यांवर चालणार्‍या कार्यकर्त्यांच्या ओल्या जेवणावळींना चाप बसला आहे. त्यामुळे इच्छुकांनी आता आपल्या वॉर्डमधील कार्यकर्त्यांच्या घरीच सोय करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळेच किरकोळ अपघात, वाद, मारामार्‍यांनाही पर्यायाने चाप बसला आहे. 

राज्य उत्पादन शुल्कची भरारी पथके

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कने चार भरारी पथके तैनात केली आहेत. या पथकांद्वारे दारू विक्रीवर करडी नजर ठेवली जात आहे. त्यात पोलिसांच्या नाकाबंदीमुळे तळीरामांनी बारमध्ये जाणे बंद केले आहे. त्यामुळे दारूचा खप निम्म्याने घटला आहे. अनेक इच्छुकांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दारू खरेदी सुरू ठेवली असली तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. निवडणुकीची धामधूम सुरू असून बार, हॉटेल चालकांना याचा फटका बसत आहे.