Wed, Jan 20, 2021 21:44
बर्ड फ्लूने पोल्ट्रीधारकांचे कंबरडे मोडले

Last Updated: Jan 13 2021 2:14AM
विटा : विजय लाळे

गेल्या सहा - सात महिन्यांत कोरोनाच्या तडाख्यातून सुटलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांना आता बर्ड फ्लूच्या साथीमुळे मोठा दणका बसतो आहे. मात्र, प्रत्यक्ष या आजारापेक्षा अफवांच्या बाजाराने इथले पोल्ट्री व्यावसायिक अधिक धास्तावले आहेत. 

संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील खानापूर, कडेगाव, आटपाडी, तासगाव तालुक्यात आणि विटा परिसरात पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे.  लेअर म्हणजे अंड्यांवरील कोंबड्यांचे या भागात पोल्ट्री फार्म्स आहेत. एका आकडेवारीनुसार सांगली जिल्ह्यात अंड्यांवरील एकूण 21 ते 22 लाख पक्ष्यांपैकी 16 लाखांवर पक्षी (म्हणजे पोल्ट्रीच्या कोंबड्या) एकट्या विटा आणि खानापूर तालुक्यात आहेत. खानापूर तालुक्यात 125 पेक्षा जास्त पोल्ट्री फार्म आहेत. गेल्या 40 ते 45 वर्षांच्या पासून या भागात हा व्यवसाय केला जातो.

मात्र पहिल्यांदा हाँगकाँगमध्ये 1997-98 साली बर्ड फ्लू हा आजार माणसामध्ये आल्याचे निष्पन्न झाले. तेव्हापासून या व्यवसायाला ग्रहण लागले. बर्ड फ्लू हा इन्फ्लूएन्झाचा एक प्रकारचा तापाचा विषाणू  आहे. त्याला एव्हिएन इन्फ्लूएन्झा असेही म्हणतात. पाण्यामध्ये राहणार्‍या पक्ष्यांमध्ये तो जास्त प्रमाणात आढळतो. बदके, कोंबड्या आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो. तो संसर्गजन्य आहे. अनेकदा स्थलांतरित पक्ष्यांमुळे संसर्ग पसरण्याचे क्षेत्र वाढते. तो माणसांमध्येही पसरू शकतो.  

एका व्यक्तीकडून दुसर्‍याकडे सहजासहजी पसरू शकत नाही. जे एकमेकांच्या जवळच्या संपर्कात असतात, त्यांच्यातच याचा संसर्ग पसरल्याचे आढळून आले आहे. पण आता हा रोग संसर्गजन्य असल्याचे संशोधकांकडून सांगितलं जाते. त्यामुळे सामान्य लोक भीतीच्या सावटाखाली आहेत. 

एका माणसाला बर्ड फ्लू विषाणूने क5छ1 प्रत्यक्ष संसर्ग केल्याची, बाब हाँगकाँगमधे तेव्हा आढळली होती. तेव्हापासून, बर्ड फ्लू विषाणू आशिया, आफ्रिका आणि युरोपच्या पक्ष्यांमध्ये पसरला आहे. हा एव्हीयन इन्फ्लूएन्झा विषाणू किंवा बर्ड फ्लू आजार हा बहुसंख्य पक्ष्यांना होतो. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (थकज) वक्तव्याप्रमाणे ह्याच्या घातक विषाणूने आशिया खंडात 2003 मध्ये 234 लोकांचा बळी घेतला आहे. 

जेव्हा बर्ड फ्लू अचानक सुरू होतो, संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात असलेले लोक आजारी पडतात.  संसर्गदूषित आणि अर्धी कच्ची चिकन किंवा अंडी खाल्ल्याने किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा रोग होऊ शकतो. बर्ड फ्लू माणसांना खूप आजारी करू शकतो किंवा ठारही मारू शकतो. सध्यातरी यावर कोणतीही लस उपलब्ध नाही. 

परभणी पाठोपाठ आता मुंबई आणि ठाण्यातही बर्ड फ्लूने (लळीव षर्श्री) शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यावसायिकांना हा धोक्याचा इशारा मानला जात आहे. देशातील काही राज्यांमध्ये स्थलांतरित पक्षांमुळे स्थानिक बदके, पाळीव कोंबड्या  आणि  अन्य पक्षांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झालेला आहे. महाराष्ट्रातही परभणीनंतर आता मुंबई आणि ठाण्यात मृत पावलेल्या पक्ष्यांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

दि.9 जानेवारी रोजी ठाण्यातील एका सोसायटीसमोर अनेक पक्षी मृतावस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती.  बगळा जातीतील हे पक्षी रस्त्यावर मृतावस्थेत पडून होते. स्थानिकांनी या घटनेबद्दल पक्षी प्रेमी, पर्यावरण प्रेमी यांना बोलावून माहिती दिली. त्यानंतर ठाणे पालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी आणि वनविभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी केल्यानंतर सर्व मृत पक्ष्यांना अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर स्वॅब घेऊन ते भोपाळ इथे पाठवले होते. आज त्याचा अहवाल आला असून बर्ड फ्लूमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात तीन पाणबगळे आणि एक पोपट बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळून आला आहे. शिवाय मुंबईत काही दिवसांपूर्वी दोन कावळ्यांचा मृत्यू झाला होता. या कावळ्यांचा स्वॅब घेऊन ते भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेकडे पाठवण्यात आला होता. त्याचे अहवाल आज आले आहेत. यात दोन्ही कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

मात्र हा आजार पाळीव कोंबड्या वगळता पोल्ट्रीच्या कोंबड्यांमध्ये आल्याचे अद्याप तरी उदाहरण नाही. तरीही क्षणाक्षणाला सुरू असलेल्या बर्ड फ्लूच्या वृत्तांमुळे जनतेत मोठा संभम निर्माण झाला आहे. 

सरकारने अनुदान जाहीर करावे : शत्रुघ्न जाधव

सांगली जिल्हा पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष शत्रुघ्न जाधव म्हणाले, आम्ही गेल्या 5 ते 6 वर्षांपासून  सर्व पक्ष्यांचे वर्षांतून 3 वेळा लसीकरण करीत असतो. तसेच अंडे, कोंबड्या किंवा मासे, चिकन, मटन आपण 100 अंश तापमानाला उकडून, शिजवून खातो  आणि 70 अंश सेल्सिअस तापमानाला बर्ड फ्लूचा विषाणू मरून जातो. त्यामुळे इतर देशांच्याप्रमाणे आपल्याला या विषाणूची भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. लोकांनी घाबरून जाऊ नये. पण मूळच्या बर्ड फ्लू आजारापेक्षा अफवा आणि बातम्यांमुळे पोल्ट्री धंद्यावर विपरीत परिणाम होत आहे. चिकन आणि अंड्यांचे दर पडत आहेत, किंवा काही व्यापारी दर पाडून मागत आहेत. त्यामुळे आता  शासनाने आम्हाला प्रति पक्षी 100 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी आम्ही केलेली आहे.

खवय्यांनी फिरवली चिकनकडे पाठ 

कोरोनानंतर आता बर्ड फ्यूचा धोका सर्वत्र घोंगावू लागला आहे. परिणामी खवय्यांनी भीतीपोटी चिकनकडे पाठ फिरवली आहे. सांगलीसह ग्रामीण भागात लोक चिकन आणि अंडी खाणे कटाक्षाने टाळत आहेत. यामुळे जिल्ह्यात चिकन व अंडीची मागणी घटली आहे. चिकनची आवक नेहमीच्या तुलनेत आहे. मात्र मागणी कमी असल्याने येत्या काही दिवसांत भावात मोठी घसरण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

स्थलांतरीत पक्ष्यांमुळे साथीचे आजार

पक्षी तज्ज्ञ शरद आपटे म्हणाले, आपल्याकडे पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्याच्या दिवसात दरवर्षीच उत्तर गोलार्धातील युरोप, सैबेरिया, मध्य आशिया या भागातील पक्षी येतात. ते समुहाने वावरतात. ते इकडे आले की  पाणथळ जागा, शेतात, पाण्याच्या किंवा हवेत संपर्कात येतात. त्यांची मर पण जास्त असते. पोल्ट्रीच्या पक्ष्यांनासुद्धा त्यांचे संक्रमण होऊ शकते. पोल्ट्रीचे पक्षी जरी बंदिस्त असले तरी दूषित खाद्य, पाणी जर पोल्ट्रीच्या पक्ष्यांना घातले तर संक्रमण होऊ शकते. माणूस जर पोल्ट्रीच्या संपर्कात आला तर  माणूस हा वाहक ठरतो.