Wed, Aug 12, 2020 08:32होमपेज › Sangli › भाजपची गुजरातमध्येही नाकाबंदी करू : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

भाजपची गुजरातमध्येही नाकाबंदी करू : थोरात

Last Updated: Feb 15 2020 2:07AM
भिलवडी : पुढारी वृत्तसेवा
महाविकास आघाडीच्या सरकारला  अनन्य साधारण महत्व आहे. याचे परिणाम देशाच्या राजकारणावर होतील. गुजरातमध्येही भाजपची नाकाबंदी करू. काँग्रेसची तत्त्वे इतिहासावर आधारित आहेत. मुलभूत टिकणारी आहेत. असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. 

अंकलखोप (ता. पलसू) येथे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचा नागरी सत्कार व डॉ. भगतसिंग हायस्कूलच्या नूतन इमारत उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती शिवाजीराव कदम, इंद्रजित मोहिते, बाळासाहेब पवार, रावसाहेब पाटील, महेंद्र लाड उपस्थित होते. थोरात यांच्या हस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन व हुतात्मा भगतसिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.  

ते  म्हणाले, भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे ही काळाची गरज होती. यासाठी आम्ही शिवसेनेसोबत जायचा निर्णय घेतला. या युतीला अनन्य साधारण महत्व आहे. याचे परिणाम देशाच्या राजकारणावर होतील. गुजरातमध्येही भाजपला नाकाबंदी करू. काँग्रेसची तत्त्वे इतिहासावर आधारित आहेत. मुलभूत टिकणारी आहेत. याला धक्के देण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्यानंतर राज्याच्या राजकारणात त्यांची जागा कोण घेणार? डॉ. विश्वजीत कदम जबाबदारी समर्थपणे पेलणार का? याची चर्चा रंगली होती. पण त्यांचे काम पाहता काळजी करायची गरज नाही तेच सगळ्यांची काळजी करतील, असे वाटते. महापुरात त्यांनी केलेल्या अतुलनीय कामाची पोहोचपावती जनतेने त्यांना दिली आहे. चांगले काम करत रहा, राज्यातच काय दिल्लीत जायची तयारी ठेवा. डॉ. कदम म्हणाले, महापुरात भाजप सरकार आंधळे, मुके व बहिरेही झाले होते. शासनाच्या मदतीची पर्वा न करता महापूरग्रस्तांना मदत केली. अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत गरजांकडे लक्ष दिले. याची पोहोचपावती म्हणूनच जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. यापुढेही जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात कमी पडणार  नाही.