Fri, Sep 25, 2020 17:08होमपेज › Sangli › मुल्लाच्या जामिनावर सुनावणी

मुल्लाच्या जामिनावर सुनावणी

Published On: Nov 22 2018 1:20AM | Last Updated: Nov 22 2018 12:26AMसांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खून प्रकरणातील संशयित पोलिस कॉन्स्टेबल नसरूद्दीन मुल्ला याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तर बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याचा मामेसासरा बाळासाहेब कांबळे यानेही गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर गुरुवारी जिल्हा व सत्र न्या. एस. एस. सापटणेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सांगलीत दाखल झाले आहेत. 

अनिकेत कोथळेच्या खूनप्रकरणी येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दि. 16 ऑक्टोबररोजी झालेल्या सुनावणी वेळी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी सर्व संशयितांवर दहा आरोप प्रस्तावित केले होते. त्यानंतर बुधवारी यावर पुढील सुनावणी होणार होती. मात्र युवराज कामटेचा मामेसासरा बाळासाहेब कांबळे याने या गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तर या खून प्रकरणातील एक संशयित नसरूद्दीन मुल्ला याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 

त्यामुळे बुधवारी या प्रकरणावर सुनावणी होऊ शकली नाही. आता गुरुवारी कांबळे आणि मुल्ला यांच्या अर्जावर दोन्ही पक्षांचे वकील युक्तीवाद करणार आहेत. या अर्जांवरील निकाल झाल्यानंतर याप्रकरणाची सुनावणी नियमित सुरू होण्याची शक्यता आहे.