Tue, Sep 22, 2020 10:46होमपेज › Sangli › अलमट्टी धरण महिन्यातच ७५ टक्के भरले

अलमट्टी धरण महिन्यातच ७५ टक्के भरले

Last Updated: Jul 13 2020 1:45AM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

कर्नाटकातील अलमट्टी धरण महिन्यातच 91.93 टीएमसी म्हणजे जवळजवळ 75 टक्के भरले आहे. जुलैअखेर धरणात 50 टक्के पाणीसाठा असायला हवा, अशी चर्चा सुरू असताना सध्या या धरणात मात्र जादा पाणीसाठा आहे. या धरणातून होत असलेल्या विसर्गाबाबत साशंकता व्यक्त होत आहे. येथून पुढे पडणार्‍या पावसाचा विचार केल्यास पुन्हा महापूर येण्याचा धोका आहे. 

अलमट्टी धरणाची पाणी साठवण क्षमता 123 टीएमसी आहे.  जुलैअखेरपर्यंत 60 ते 65 टीएमसी साठा अपेक्षित असताना या ठिकाणी सध्याच 91.92 टीएमसी साठा आहे. दुसरीकडे  अलमट्टी धरणात सध्या पाण्याची सरासरी आवक सुमारे 70 हजार  क्युसेक प्रतिसेंकद असताना विसर्ग मात्र 36 हजार 130 क्युसेक आहे. त्यावरून धरणात झपाट्याने पाणी पातळी वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे, तसेच गेल्या महिन्याभरात या धरणातून पाणी कमी प्रमाणात सोडल्याची शक्यता आहे. 

गेल्या वर्षी कृष्णा आणि उपनद्यांना आलेल्या महापुरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात हाहा:कार उडाला होता. कराड तालुक्यालाही फटका बसला. आतापर्यंतच्या पुराचे रेकॉर्ड मोडले गेले. या पुराच्या धक्क्यातून अद्यापही लोक सावरलेले नाहीत.  त्यातच यंदाही चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नदीकाठावरील लोकांनी महापुराची धास्ती घेतली आहे. महापूर टाळण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार आणि  प्रशासकीय पातळीवरही नियोजन सुरू आहे. पुराचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या वडनेरे समितीच्या अहवालावर येथे बैठक घेऊनही चर्चा झाली. निवृत्त अभियंत्यासह अनेकांनी   जुलैअखेर अलमट्टी  धरणात जादा पाणीसाठा ठेऊ नये, असे मत व्यक्त केले आहे. 

कोयना धरणामध्ये सध्या 42.43 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. धरणाची साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे.  धोम धरणात 6.23 टीएमसी पाणीसाठा असून  साठवण क्षमता 13.50 टीएमसी, कण्हेर धरणात 3.89 टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टीएमसी आहे. उरमोडी धरणात 5.92 टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टीएमसी, तारळी  धरणात 2.35 टीएमसी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टीएमसी आहे.   कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 14.91 टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 4.81 टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टीएमसी आहे. 34.40 टीएमसी क्षमतेचे चांदोली धरणात 19 टीएमसी भरले आहे. 

दरम्यान,  कोयना धरणातून 2 हजार  167    क्युसेक विसर्ग गेल्या महिन्याभरापासून आहे. चांदोली धरणातून 1 हजार 255, कण्हेर 24, दूधगंगा 600, राधानगरी 1 हजार 450, कासारी 250, उरमोडी 300 क्युसेक विसर्ग सुरू आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कमी कालावधीत जोरदार पाऊस झाल्यास महापूर पुन्हा येेण्याचा धोका नाकारता येत नाही. 

दोन्ही राज्यांची चर्चा होऊनही  पाणीसाठा जादा 

अलमट्टी धरणातील पाणीसाठा, विसर्ग याबाबत मुंबईत जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे जलसंपदामंत्री रमेश जारकिहोळी यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये धरणातील पाण्याच्या नियोजनाबाबत सकारात्मक चर्चा झाली. तरीसुद्धा आताच पाणीसाठा 92 टीएमसी आहे.  ऐनवेळी पाणी वाढल्यानंतर महापुराचे नियोजन कसे होणार, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. 

अलमट्टी धरणाच्या पाण्याची पातळी जुलैअखेरपर्यंत 517 फूट ठेवणे आवश्यक आहे. ती आताच 517. 36 फूट झालेली आहे. अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवल्यास वारणा आणि पंचगंगा नदीच्या पात्राबाहेर पाणी पडणार नाही. या धरणात पाण्याची आवक 70 हजार क्युसेक असताना विसर्ग मात्र 36 हजार क्युसेक इतका आहे. महापुराचा धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने आताच नियोजन करणे आवश्यक आहे. 
- विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता, पाटबंधारे विभाग

 "