Sat, Oct 31, 2020 13:42होमपेज › Sangli › आम्ही शब्दांच्या ‘गोळ्या’ झाडल्यावर मुख्यमंत्री ठाकरे ‘मातोश्री’तून बाहेर

आम्ही शब्दांच्या ‘गोळ्या’ झाडल्यावर मुख्यमंत्री ठाकरे ‘मातोश्री’तून बाहेर

Last Updated: Oct 19 2020 1:22AM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

आम्ही  दररोज टीकेच्या ‘गोळ्या’ झाडल्यानंतर अखेर मुख्यमंत्री ‘मातोश्री’वरून  बाहेर पडले आहेत. घरात बसून नुकसानभरपाई देऊ शकत नाही, तर त्यासाठी बांधांवर जावे लागते. बहुदा आता हे मुख्यमंत्र्यांना कळले असेल, अशी जोरदार टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. 

ते म्हणाले, राज्यात अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन करायचे नसतात, तर प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन करायचे असतात. परंतु, असे होताना दिसत नाही. 

ते पुढे म्हणाले, राज्य सरकार नुकसानीची भरपाई देण्यापासून अंग झटकत आहे. केंद्राने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. परंतु केंद्राकडे मागणी करता मग तुम्ही काय करता. 

पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधांनाच्या भेटीला जाणार  असतील तर तो त्यांचा विषय आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधांनाकडे नेण्याचा निर्णय   घेतला तर  मात्र  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या सोबत  मागण्या मांडण्यासाठी जातील .

ते म्हणाले, राजू शेट्टी हे महान शेतकरी नेते आहेत. त्यांना आता विधानपरिषद मिळणार आहे. त्यामुळे त्यांना आता शेतकर्‍यांचा विसर पडला आहे.  यावेळी पाटील यांनी महापालिकेतील नगरसेवकांची कानउघडणी केली. ते म्हणाले, महापालिकेत एकहाती सत्ता आहे. 43 नगरसेवक आपल्याकडे आहेत. परंतु तरी देखील स्थायी समितीच्या सभापती पदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक का? 43 नगरसेवक असताना  त्यांना सहलीला का पाठवावे लागते?  हे माझ्या मनात शल्य आहे. भाजपच्या नेत्यांनी रात्री झोपताना याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. 

मुख्यमंत्र्यांनी रागवायचे कारण नाही

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्राबाबत ते म्हणाले, राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यातील नागरिकांच्या मागणीनुसार सर्व नियमांचे पालन करुन मंदिरे उघडण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी एवढे रागवायचे काहीच कारण नाही. तसेच या पत्राबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली नसून वेगळा शब्द वापरता आला असता, असे म्हटले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 "