Fri, Sep 18, 2020 19:56होमपेज › Sangli › कर्जदारांची ३५ लाखांची फसवणूक

कर्जदारांची ३५ लाखांची फसवणूक

Published On: Dec 31 2017 1:28AM | Last Updated: Dec 31 2017 12:10AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

शहरातील राम मंदिर चौकातील इंडसइंड बँकेतील व्यवसाय कार्यकारी अधिकार्‍याने कर्जाची रक्‍कम भरून घेऊन त्यांना बनावट ना हरकत दाखले दिले आहेत. कर्जाची सुमारे 35 लाखांची रक्‍कम त्याने हडप केली आहे, अशी तक्रार त्या अधिकार्‍याविरोधात शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मनोज कुमार पाटील (रा. टाकळी, ता. मिरज) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बँकेचे कर्मचारी गिरीश पांडुरंग कुलकर्णी (वय 38, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पाटील इंडसण्ड बँकेत व्यवसाय कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात. त्यांनी जून 2016 ते 12 डिसेंबरपर्यंत अनेक कर्जदारांकडून कर्जाची रक्कम भरून घेतली आहे. त्यापोटी त्यांनी बनावट ना हरकत दाखले त्यांना दिले आहेत. आरिफ मुजावर यांच्याकडून 2 लाख 34 हजार 450 रूपये कर्जापोटी भ़रून घेतले. 

त्याशिवाय मालगाव (ता. मिरज) येथील अनिल वसंत बेंडगे यांच्याकडून चार लाख तर संजय वसंत बेंडगे यांच्याकडून दोन लाख रूपये भरून घेतले. रक्कम भरल्यानंतर या तिघांसह अन्य कर्जदारांना पाटील यांनी बनावट ना हरकत दाखले दिले आहेत. कर्जदारांकडून घेतलेले पैसे त्याने बँकेत भरलेले नाहीत. शुक्रवारी कर्जदार ते दाखले घेऊन बँकेत गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

त्यानंतर बँकेच्या अधिकार्‍यांनी तपासणी केल्यानंतर या तिघांशिवाय अन्य कर्जदारांकडून मिळून त्यांनी सुमारे 30 ते 35 लाख रूपये घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज बँकेचे कर्मचारी  कुलकर्णी यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात मनोज पाटील विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.