Sat, Jul 11, 2020 11:01होमपेज › Sangli › सांगलीत नवे 16 पॉझिटिव्ह; 15 कोरोनामुक्‍त

सांगलीत नवे 16 पॉझिटिव्ह; 15 कोरोनामुक्‍त

Last Updated: Jul 01 2020 8:05AM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे नवे 16 रुग्ण आढळले. कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या बिळूर (ता. जत) येथील नवीन 6 व्यक्‍तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. दुधोंडी (ता. पलूस) येथील बाधिताच्या कुटुंबातील 5 व्यक्‍ती, ब्रह्मनाळ येथील 2 व्यक्‍ती, तासगाव शहरातील एका खासगी दवाखान्यातील 2 कर्मचारी तसेच अथणी (जि. बेळगाव) येथील एका व्यक्‍तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. 
जिल्ह्यात मंगळवारअखेर कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍तींची संख्या 384 झाली आहे. त्यापैकी 241 व्यक्‍ती कोरोनामुक्‍त झाल्या आहेत. मिरज येथील शासकीय कोविड रुग्णालयात 131 व्यक्‍ती उपचाराखाली आहेत. त्यापैकी 5 व्यक्‍तींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मंगळवारअखेर मृतांची एकूण संख्या 12 आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 

बिळूर हे गाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनू लागले आहे. मंगळवारी बिळूरमधील 6 व्यक्‍तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये 50 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय महिला, 38 वर्षीय महिला, 10 वर्षाचे बालक, 13 वर्षाचे बालक आणि 21 वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे. बिळूरमधील एकूण कोरोना बाधितांची संख्या 19 झाली आहे.  दुधोंडी (ता. पलूस) येथील बाधित व्यक्‍तीच्या कुटुंबातील 56 वर्षीय
महिला, 28 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरूष, 23 वर्षीय महिला आणि 2 वर्षाच्या बालकाचा कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथील 36 वर्षीय पुरूष आणि 40 वर्षीय पुरूष  यांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 

वाघापूर (ता. तासगाव) येथील कोेरोना बाधित महिलेने सावळज व तासगाव येथील खासगी दवाखान्यात उपचार घेतले होते. सावळजच्या दवाखान्यातील डॉक्टर व कर्मचार्‍यांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. मात्र तासगाव येथील खासगी दवाखान्यातील 2 कर्मचार्‍यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. दवाखान्यातील अन्य तीन व्यक्तींच्या चाचणी अहवालाची प्रतिक्षा आहे. 

9 महिन्यांच्या बालकासह 15 व्यक्ती कोरोनामुक्त 

शिराळा येथील 63 वर्षीय पुरूष, मणदूर (ता. शिराळा) येथील 25 वर्षीय महिला, किनरेवाडी (ता. शिराळा) येथील 75 वर्षीय महिला, बिळाशी (ता. शिराळा) येथील 60 वर्षीय पुरूष, निगडी (ता. शिराळा) येथील 32 वर्षीय महिला व 9 महिन्यांचे बालक, बामणोली (ता. मिरज) येथील 33 वर्षीय महिला, मौजे डिग्रज (ता. मिरज) येथील 33 वर्षीय महिला, दुधोंडी (ता. पलूस) येथील 79 वर्षीय व्यक्ती व अन्य एक व्यक्ती, आंधळी (ता. पलूस) येथील 74 वर्षीय पुरूष, पुजारवाडी (ता. आटपाडी) येथील 53 वर्षीय पुरूष, मांजर्डे (ता. तासगाव) येथील 45 वर्षीय पुरूष, गव्हाण (ता. तासगाव) येथील 60 वर्षीय पुरूष, वशी (ता. वाळवा) येथील 29 वर्षीय पुरूष यांनी मंगळवारी कोरोनावर मात केली. त्यांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले.