पिंपरी : प्रतिनिधी
जमिनीच्या व्यवहारातून दोन लहान भावांनी मारहाण केल्याने तरुणाने आत्महत्या केली. सोमवार (दि.२५) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
अविनाश संभाजी पवार ( २९,रा. बेलठिका नगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथील शिवकॉलनी समोर एकजण बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी त्यास त्वरित रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मृत तरुणाच्या खिशात एक चिठ्ठी आणि आधारकार्ड मिळाले. त्याची खात्री केल्यानंतर हा मृतदेह अविनाशचा असल्याची ओळख पटली.
जमिन विकून मिळालेल्या पैशाच्या वादातून लहान भावांनी मारहाण केल्याचे मिळालेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास वाकड पोलिस करीत आहेत.