Thu, Jul 02, 2020 18:10



होमपेज › Pune › येरवडा पोलिसांनी बाल विवाह रोखला

येरवडा पोलिसांनी बाल विवाह रोखला

Published On: May 27 2018 9:02PM | Last Updated: May 27 2018 9:05PM



येरवडा : वार्ताहर

मित्राबरोबर विवाह केला नाही तर पळून जाऊ अशी धमकी मुलीने पालकांना दिली. मात्र विवाह आंतरजातीय असल्यामुळे पालकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला असता मुलगी नाराज झाली. मुलीने हट्ट केल्याने पालक लग्नास तयार झाले. त्यांनी लग्नाची जोरात तयारी केली. मात्र, बोहल्यावर चढण्यासाठी काही कालावधी असताना अज्ञात व्यक्तीने मुलगी अल्पवयीन असल्याचे पोलिस नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून सांगितले. त्यानंतर पोलिसांची धावपळ सुरू झाली आणि अखेर येरवडा पोलिसांनी विवाह रोखला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साधना व विकास (नाव बदललेली आहेत) यांच्यात ओळखीतून प्रेम झाले. साधनाने विकासबरोबर विवाह करण्यासाठी पालकांकडे हट्ट धरला; मात्र विकास दुसऱ्या जातीतील असल्यामुळे सुरवातीला साधनाच्या पालकांनी विवाहाला विरोध केला. त्यानंतर साधनाने  पालकांना पळून जाऊन विवाह करणार असल्याचे सांगितले.   

त्यामुळे अखरे पालकांनी तिचा विकाससोबत विवाह करण्यास संमती दिली. एवढेच नाही तर विवाहाचा शुक्रवारी (ता. 25) मुहूर्त काढून पाहुणेमंडळींना लग्नपत्रिकासुद्धा वाटल्या.  विवाहाचा दिवस उजाडला; मात्र विवाहाच्या काही तासांआधी एका अज्ञात व्यक्तीने पोलिस नियंत्रण कक्षाला येरवड्यात अल्पवयीन मुलीचा विवाह असल्याची माहिती दिली. 

पोलिस नियंत्रण कक्षाने येरवडा पोलिस ठाण्याला ही माहिती कळविली. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली. वधू व वरांचे पालक थेट पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांनी साखरपुडा आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र अधिक चौकशी केल्यानंतर विवाह असल्याचे समजले. पालकांकडून लेखी लिहून घेऊन बालविवाह रोखल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक संतोष दराडे यांनी दिली.