Sat, Jul 11, 2020 09:17होमपेज › Pune › राज्यात 18 डॉक्टरांच्या बलिदानानंतरही कोरोनाशी युद्ध सुरूच

राज्यात 18 डॉक्टरांच्या बलिदानानंतरही कोरोनाशी युद्ध सुरूच

Last Updated: Jul 01 2020 8:03AM
पुणे : आशिष देशमुख

कोरोनासारखे संकट आजवर कधी पाहिले नाही. त्यासाठी स्वतःचे प्राण धोक्यात घालून महाराष्ट्रातील 18 डॉक्टरांनी कोरोना विषाणूशी लढताना स्वतःचे बलिदान दिले आहे. आजतागायत 1,500 डॉक्टर क्वारंटाईन झाले आहेत. तर 900 कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टर उपचारानंतर बरे झाले आहेत. जगात 198 पेक्षा जास्त, तर भारत देशात 31 डॉक्टरांनी स्वतःचे बलिदान देत शेकडो रुग्णांचे प्राण वाचवले. डॉक्टर म्हणतात, रात्रंदिन आम्हाला सहकुटुंबच युद्धाचा प्रसंग आहे. आम्ही देव नाही, आम्हाला माणूस म्हणून वागवा, अशी अपेक्षा राज्यातील दिग्गज डॉक्टरांनी प्रातिनिधिक स्वरूपात राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त व्यक्त केली .

यंदाचा 1 जुलै हा राष्ट्रीय डॉक्टरदिन सर्वच कोरोना योद्धा डॉक्टरांना प्राणाची बाजी लावतच पीपीई किट घालून रुग्णसेवेतच साजरा करावा लागणार आहे. भारतातील, महाराष्ट्रातील डॉक्टर बांधवांनी जी राष्ट्रसेवा केली आहे तिला तोड नाही.जगात जवळपास सर्वच देशांतील डॉक्टरांनी कोरोना झालेल्या रुग्णाचे प्राण वाचवताना स्वतःचे बलिदान दिले. आजवर इटलीत सर्वाधिक 100 डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ इंग्लंड, अमेरिका आणि भारतात 31 डॉक्टरांनी बलिदान दिले. डॉक्टरांच्या बलिदानाचे आकडे कोणत्याही देशाने अधिकृतपणे जाहीर केले नाहीत. महाराष्ट्रातील 18 डॉक्टरांच्या बलिदानाची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अधिकृत सूत्रांनी दिली असली, तरी राज्य शासनाने ती अद्यापही जाहीर केली नाही. त्यांना सीमेवर शहीद झालेल्या सैनिकांप्रमाणे 
मानवंदनाही दिली नाही. फक्त इटली आणि इंग्लंडने तेथे बलिदान देणार्‍या डॉक्टर आणि नर्सची यादी फोटोसह प्रसिद्ध केली आहे. 

भारतात मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांना लागण : भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात डॉक्टरांनी प्राणाची बाजी लावत रुग्णसेवा केली आणि करत आहेत. 6 मेपर्यंत देशात वैद्यकीय क्षेत्रातील एकूण 548 कर्मचार्‍यांना लागण झाल्याचे वृत्त ‘पीटीआय’च्या हवाल्याने आले. यात मात्र मृत डॉक्टरांचा आकडा दिलेला नाही. मात्र, काही आंतरराष्ट्रीय इंग्रजी वैद्यकीय नियतकालिकात 30 मेपर्यंत भारतात 31 डॉक्टर व तीन नर्सचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. भारतात अनेक डॉक्टर कोरोनाचा मुकाबला करून बाहेर आले, मृत्यूलाही जिंकून पुन्हा रुग्णसेवेत आले, अशी उदाहरणे खूप आहेत.