Tue, Jun 15, 2021 11:15
पुणे : पिंपळे गुरव येथे बर्निंग कारचा थरार!

Last Updated: May 11 2021 5:56PM

पिंपळे गुरव : प्रज्ञा दिवेकर

पुण्यातील पिंपळे गुरव परिसरतील मयुरीनगरी सोसायटी फेज एक आणि मयुर नगरी फेज दोन मधील रस्त्यावर पार्किंग  केलेल्या चारचाकी गाड्यांनी अचानक पेट घेतला. ही घटना आज (दि. ११) दुपारी घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण होते. 

अधिक माहिती अशी की, मयुर नगरी फेज दोन समोरील रस्त्यालगत एमजीनल (mgnl) गॅस पाईप लाईनचे काम चालू होते. आज (दि. ११) सकाळी अकरापासून गॅस लिक झाल्याचा वास येत होता. यानंतर सोसायटीत पाहणी केल्यावर बाहेरील रस्त्यावरील  गॅस पाईप लाईनचे लिकेज झाल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच संबधित अधिकाऱ्यांना घटना स्थळी पाचारण करण्यात आले. दुरुस्ती काम चालू असतानाच अचानक जवळच पार्किंग केलेल्या चारचाकी चार गाड्यांनी पेट घेतला. असे प्रत्यक्षदर्शींनी माहिती देताना सांगितले.

स्थानिक सोसायटी आणि राजेंद्र राजापूरे यांना आगीची घटना कळताच तात्काळ अग्नीशमक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्नीशमक दलाच्या कर्मचा-यांकडून तातडीने आग विझवण्यात यश मिळवले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती समजते आहे.