Wed, Aug 12, 2020 08:54होमपेज › Pune › बारामतीमध्ये पडळकरांच्या प्रतिमेला दूग्धाभिषेक! (video)

बारामतीमध्ये पडळकरांच्या प्रतिमेला दूग्धाभिषेक! (video)

Last Updated: Jun 28 2020 2:17PM
बारामती : पुढारी वृत्तसेवा 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दूग्धाभिषेक घालत भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे समर्थन केले. बारामती तालुक्यातील उंडवडी येथे हा कार्यक्रम भाजपने आयोजित केला होता. दरम्यान याप्रकरणी प्रमुख सहाजणांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बारामतीचा दौरा आटोपून दुसऱ्या दिवशी पंढरपुरात गेलेल्या आमदार पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याची टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. बारामतीत राष्ट्रवादीने पडळकर यांच्या विरोधात संताप व्यक्त करत पोलिस ठाण्यात धाव घेतली. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून पडळकरांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

त्याच दिवशी भाजपने बारामतीत हाती फलक घेत पडळकर यांचे समर्थन केले. दरम्यान हा विषय आता संपला आहे, असे वाटत असतानाच रविवारी (दि.२८) भाजपने उंडवडी येथे आमदार पडळकरांच्या प्रतिमेला दूग्धाभिषेक घातला. त्यानंतर बारामती शहरातही पडळकरांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष पांडूरंग कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, गोविंद देवकाते, अॅड. ज्ञानेश्वर माने यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.