होमपेज › Pune › ‘दुर्गम’ शिक्षकांचा विधानभवनासमोर एल्गार

‘दुर्गम’ शिक्षकांचा विधानभवनासमोर एल्गार

Published On: May 04 2018 2:00AM | Last Updated: May 04 2018 1:51AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यात जिल्हा परिषदेच्या जिल्हांतर्गत बदलीवरून सध्या सुगम आणि दुर्गम असा वाद सुरू झाल्याचे दिसत आहे. नुकताच औरंगाबादमध्ये सुगम भागातील शिक्षकांनी मोर्चा काढून नवीन सर्वसमावेशक बदली धोरण तयार करण्याची मागणी केली आहे. तर गुरुवार, दि. 3 रोजी राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून दुर्गम भागातील शिक्षकांनी विधानभवनासमोर एकत्र येत बदली समर्थनार्थ एल्गार पुकारला आणि कोणत्याही परिस्थितीत बदल्या झाल्याच पाहिजेत, नाहीतर बदली होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याची वज्रमूठ बांधली. त्यामुळे येत्या काळात बदली प्रक्रियेवरून सुगम आणि दुर्गम भागातील शिक्षकांमध्ये कलगीतुरा रंगणार असून शासनापुढील अडचणी वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यातील जिल्हा परिषदेच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी 27 फेब्रुवारी 2017 रोजी शासनाने बदलीचा अध्यादेश काढला आहे. या बदली अध्यादेशावरून शिक्षकांची सुगम आणि दुर्गम अशा दोन गटांत विभागणी झाली आहे. सुगम भागातील शिक्षकांना सर्वसमावेशक नवीन बदली धोरण हवे आहे. तर दुर्गम भागातील शिक्षकांना बदली हवी आहे. त्यामुळे दोन्ही संघटना मोर्चे काढत आहेत. दुर्गम भागातील शिक्षकांना येत्या 8 मेपर्यंत बदल्या करण्याचे आश्‍वासन राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि ग्रामसचिव असिम गुप्ता यांनी दिले होते. पंरतु सध्याची स्थिती पाहता 8 मेपर्यंत बदल्या होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.

त्यामुळे बदल्यांच्या समर्थनार्थ राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील दुर्गम भागातील शिक्षकांनी जिल्हा परिषद कार्यालय ते विधानभवन असा मोर्चा काढत लवकरात लवकर बदल्या करण्याची मागणी केली. त्यासंदर्भातील निवेदन विभागीय सहायक आयुक्त विलास जाधव यांना देण्यात आले. यामध्ये शासनाकडून 27 फेब्रुवारीच्या अध्यादेशानुसार बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे. त्यामुळे शासनाच्या समर्थनार्थ आम्ही मोर्चा काढला असून कोणत्याही दबावाला न जुमानता शासनाने लवकरात लवकर बदलीप्रक्रिया राबवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली .