Tue, Jun 15, 2021 11:41
रोजगार वाढवा आणि दाढी तेवढी करा! पीएम मोदींना बारामतीच्या चहावाल्याने १०० रूपयांची मनी ऑर्डर पाठवली

Last Updated: Jun 10 2021 8:22AM

बारामती; पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्‍यांच्या वाढवलेल्या दाढीमुळे सध्या जास्त चर्चेत आहेत. त्‍यातच आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. याचे कारण ठरलाय बारामतीचा एक चहावाला. या चहावाल्‍याने पंतप्रधान मोदी यांना दाढी करण्यासाठी चक्‍क १०० रूपयांची मनऑर्डर पाठवली आहे. 

अधिक वाचा : रेमडेसिव्हीर, स्टेरॉइड देऊ नये! कोरोनाबाधित मुलांच्या उपचारासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्‍यांच्या नव्या लुकमुळे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. गेल्‍या काही दिवसांपासून मोदी यांची दाढी सोशल मीडियात चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. यावरून विरोधकांनी त्‍यांच्यावर टिका देखील केली आहे. मात्र आता बारामतीच्या चहावाल्‍याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढलेली दाढी कापण्यासाठी चक्‍क १०० रूपयांची मनीऑर्डर केली आहे. अनिल मोरे असे या चहावाल्याचे नाव आहे. शहरातील इंदापूर रस्त्यावर एका खासगी रुग्णालयासमोर अनिल मोरे  हे आपली चहाची टपरी चालवतात.

अधिक वाचा : मुंबईतील मालवणी भागात इमारत कोसळून ११ जण मृत्यूमुखी

पंतप्रधान मोदी हे दाढी वाढवून सर्वत्र फिरत आहेत. त्‍यांना वाढवायचेचं असेल, तर देशातील रोजगार वाढवावा. कोरानाच्या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्‍य सुविधेत वाढ करावी, लसीकरणाचा वेग वाढवावा. लोकांच्या समस्‍या सुटण्यासाठी प्रयत्‍न करावेत अशी भूमीका त्‍यांनी मांडली आहे. 

अधिक वाचा : मुंबईत घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे निर्देश

मी माझ्या कमाईतून पंतप्रधान मोदी यांना दाढी करण्यासाठी १०० रूपये पाठवत आहे. पंतप्रधानांचे पद हे देशाचे सर्वोच्च पद आहे. नरेंद्र मोदी हे देशातील मोठे नेते असून, त्‍यांच्या विषयी मला आदर आहे. त्‍यांना त्रास देण्याचा माझा कोणताही हेतू नाही. मात्र सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटकाळात देशात आरोग्‍याच्या सुविधा आणि रोजगार वाढवावा या मागणीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी हा मार्ग निवडल्‍याचे अनिल मोरे यांनी म्‍हटले आहे. मोरे यांनी १०० रूपयांच्या मनीऑर्डर सोबत एक पत्र पाठवले आहे. यामध्ये कोरानामुळे मृत्‍यू झालेल्‍यांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपये देण्याची मागणी त्‍यांनी केली आहे.