Tue, Jun 15, 2021 11:43
पुणे : ब्लेडने गळा चिरुन केला वडीलांचा खून, मृततदेह तीन दिवस ठेवला घरातच

Last Updated: Jun 10 2021 7:38PM

उरूळी कांचन : पुढारी वृत्तसेवा 

सततचे आजारापण काढणाऱ्या आपल्याच वडीलांचा मुलानेच ब्लेडने गळा चिरून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. मुलाने वडीलांचा खून करुन कुटुंबियातील सदस्यांना खुनाची धमकी देऊन वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तब्बल तीन दिवस मृतदेह घरात ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला उरुळी कांचन (ता. हवेली, जि. पुणे) परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. 

रहिम गुलाब शेख (वय ६७, रा. संस्कृती नगर, तुपे वस्ती उरुळी कांचन) असे खून झालेल्या वृद्ध वडीलांचे नाव आहे. तर पोलिसांनी नईम रहिम शेख (३८, रा. संस्कृती नगर तुपे वस्ती, उरूळी कांचन) असे खून केलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मुलगी शैनाज रशीदखान जामदार (४०) यांनी पोलिसांत खूनाची तक्रार दिली आहे. 

लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिम शेख हे आपल्या मुलगी शैनाज इनामदार यांच्या घरी मुलगा नईम शेख यांच्या समवेत वास्तव्यास आहे. वडील रहिम शेख हे सततपणे आजारी असल्याने त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरू होते. अशात आजारी असल्याने त्यांची कुटुंबियांनी कोरोना चाचणी करुन घेतली होती. वडील आजारी असल्याने मुलगा रईम शेख याने वडीलांशी मंगळवारी (दि. ८) वाद घातला होता. भांडणातच त्याने सायंकाळच्या वेळी वडीलांवर कुटुंबातील सदस्यांना न कळताच त्यांचा गळा ब्लेड ने चिरुन खून केला. या खूनाचा प्रकार समजताच कुटूंबातील सदस्यांना खूनाची धमकी देऊन वाच्यता केली तर तुमचा खून करू अशी धमकी नईम देत होता अखेर मयत रहिम यांची मुलगी शैनाज यांनी धैर्य दाखवून हा खून झाल्याची खबर देऊन खूनाचा प्रकार उघडकीस आणला.

दरम्यान वडीलांचा खून करुन आरोपी नईम हा नशेत उरुळी कांचन रेल्वे स्थानक परिसरात गुरुवारी (दि. १०) वावरत होता. पोलिसांना खूनाचा उलगडा होताच त्यांनी आरोपी नईम शेख याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. खूनाची माहिती मिळताच तपासाची सर्व सुत्रे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी हातात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. रात्री उशिरापर्यंत खूनाची तक्रार घेण्याचे काम शहर पोलिसांकडून सुरू होते. 

घटनेची माहिती मिळताच पुणे शहर पोलिस मंडळ ५ चे उपायुक्त नम्रता पाटील,सहाय्यक पोलिस आयुक्त हडपसरचे कल्याण विधाते ,लोणी काळभोर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष काळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची माहिती घेतली आहे.या गुन्हाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार करीत आहे.