Sat, May 30, 2020 01:54होमपेज › Pune › पुणे : पारंपरिक 'मारामारी' प्रथेने श्रीक्षेत्र वीर यात्रेची सांगता (video)

पुणे : पारंपरिक 'मारामारी' प्रथेने श्रीक्षेत्र वीर यात्रेची सांगता (video)

Last Updated: Feb 19 2020 1:17AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व माता जोगेश्वरी यांच्या शनिवार (दि. ८) माघ पौर्णिमेपासून मंगळवार (दि. १८) दशमीपर्यंत सुरू असलेल्या ११ दिवसांच्या यात्रेची सांगता पारंपरिक 'मारामारी' (रंगांचे शिंपण) ने झाली. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी गुलाल खोबऱ्यारी मुक्त उधळण करून 'नाथ साहेबाचं चांगभलं, सवाई सर्जाच चांगभलं'चा गजर केला. दिवसभरात पाच लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली.

मंगळवार (दि. १८) हा यात्रेचा मुख्य दिवस व पारंपरिक मारामारीने यात्रेची सांगता झाली. दरम्यान, सोमवारी रात्री देऊळवाड्यात छबिन्याला सुरुवात झाली. पहाटे भाकणुकीनंतर छबिन्याची सांगता झाली. मंगळवारी दुपारी १२ नंतर कोडीत, कण्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे, वीर, वाई आणि सोनवडीच्या श्रीनाथ म्हस्कोबांच्या पालख्या व सर्व काठ्या देऊळवाड्यात आल्या. दुपारी १ वाजता छबिन्यासह सर्व पालख्या व काठ्यांची एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर दुपारी १.२५ वाजता देवाचे मानकरी तात्या बुरुंगुले, दादा बुरुंगुले, लक्ष्मण शिंगाडे यांची वार्षिक पीकपाण्याची भकणूक झाली. त्यांनतर ठीक १.३० वाजता देवाचे मानकरी भारत जमदाडे परिवाराकडून रंगाचे शिंपण करण्यात आले. त्यानंतर सर्व पालख्या, काठ्यांची एक मंदिर प्रदक्षिणा होऊन दुपारी ३ वाजता सर्व लवाजमा देऊळवाड्याबाहेर पडून पारंपरिक मारामारीने या ११ दिवसांच्या यात्रेची सांगता झाली. 

यावेळी श्रीनाथभक्त विशाल दत्तात्रय धुमाळ यांच्या वतीने हेलिकॉप्टरमधून मंदिर परिसरात पुष्पवृष्टी करण्यात आली. आमदार संजय जगताप, पुरंदरचे तहसीलदार, श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ, उपाध्यक्ष संभाजी धुमाळ, सचिव तय्यद मुलाणी, तसेच विश्वस्त दत्तात्रय धुमाळ, दिलीप धुमाळ, ज्ञानेश्वर धुमाळ, अशोक वचकल, बबन धसाडे, नामदेव जाधव, सुभाष समगीर, सरपंच माउली वचकल, सर्व सदस्य, देवस्थानचे सर्व मानकरी, सालकरी, पुजारी, वीर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या सामूहिक नियोजनातून हा सोहळा उत्तमरीत्या पार पडला.