Fri, Nov 27, 2020 23:25होमपेज › Pune › पुणे: वकिलाचा खून, दृश्यम स्टाईलनं रचला कट

पुण्यात वकिलाचा खून : शेंडे मास्टरमाईंड; दृश्यम स्टाईलनं रचला कट

Last Updated: Oct 21 2020 1:15AM

वकील उमेश चंद्रशेखर मोरेपुणे : पुढारी वृत्तसेवा 

पुण्यातील वकिलाचा अपहरण करून खून प्रकरणातील रोहित शेंडे हा खुनाच्या कटाचा मास्टर माईंड असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. उमेश चंद्रशेखर मोरे (रा. बालाजीनगर धनकवडी) असे खून झालेल्या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मोरे यांना न्यायालयाजवळून दुचाकीवर बसवून त्यानंतर चारचाकी गाडीतून घेऊन जाण्यापासून, ते खून करून मृतदेह जाळण्यापर्यंत शेंडे हा पडद्यामागून सूत्र हलवत होता. मोरे यांचा काटा काढण्यासाठी आरोपींनी पूर्वनियोजित तयारी केली असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मोरे यांना घेऊन जाण्यासाठी वापरण्यात आलेली चारचाकी गाडी कपिल फलके याची वापरली आहे. फलके याने सुरुवातीपासूनच पोलिसांना गुंगारा देण्याची काळजी घेतली आहे. त्याने त्याच्याकडील गाडीची नंबरप्लेट वेळोवेळी बदलली असून, मोरे यांचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर अंगावरील कपडेदेखील नष्ट केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांचा तपास वेळोवेळी भरकटत राहावा, यासाठी मोरे यांचा मोबाईल मुंबईहून पुण्याकडे येणार्‍या ट्रकमध्ये ताथवडे परिसरात टाकून दिला. त्यामुळे पोलिस पाच दिवस मार्केटयार्डसह इतर ठिकाणी ट्रकच्या पाठीमागे फिरत होते. मात्र आरोपी गुन्हा करताना कोणता न कोणता पुरावा मागे सोडत असतो. ताथवडे परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यात आरोपींची चारचाकी गाडी कैद झाली होती. त्यावरून पोलिसांनी तपास केला असता, गाडी दिसून आली. मात्र गाडीचा नंबर चुकीचा निघाला. पोलिसांनी इतर ठिकाणाच्या कॅमेर्‍यांची पाहणी केली तेव्हा संबंधित गाडी कपिल फलके याच्या मालकीची असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे इतर संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता मोरे यांच्या खुनाची कबूली दिली.

संशयित आरोपी अ‍ॅड. रोहित शेंडे हा भूमी अभिलेख व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात वकिली करत होता. तर अ‍ॅड. मोरे पर्वती येथील एका भूखंडाच्या प्रकरणात सातबारावरील नावे कमी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात गेले होते. तेथे अ‍ॅड. शेंडे याने त्यांना १ कोटी ७० लाखांची लाच मागितली होती. या प्रकरणात अ‍ॅड. मोरे यांनी तक्रार केल्यावर अ‍ॅड. शेंडेला लाचलुचपत पथकाने पथकाने पकडले होते. लाच प्रकरणाच्या दुसर्‍याच दिवशी अ‍ॅड. मोरे यांना दोघांनी पिस्तुलाच्या धाकाने धमकावले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

१ ऑक्टोबरला घडलेल्या गुन्ह्याची फिर्याद ५ ऑक्टोबरला

अ‍ॅड. मोरे (३२, रा. धनकवडी) हे एक ऑक्टोबरला शिवाजीनगर न्यायालयात गेले होते. मात्र रात्री साडेनऊपर्यंत परत न आल्याने त्याच्या घरच्यांनी २ ऑक्टोबरला शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. तेथे पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र अ‍ॅड. मोरे यांच्या नातेवाइकांना घातपात झाल्याची शक्यता वाटत असल्याने त्यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी ५ ऑक्टोबरला अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अखेर सोमवारी सकाळी (दि. १९) अ‍ॅड. मोरे यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत ताम्हिणी घाटात सापडला.

त्या लाच प्रकरणात अद्यापही आरोपपत्र दाखल नाहीच

भूमी अभिलेख विभागात वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या एका तत्कालीन अधिकार्‍याच्या सांगण्यावरूनच अ‍ॅड. शेंडे याने १ कोटी ७० लाखांची लाच मागितल्याचा प्रकार तेव्हा समोर आला होता. या वरिष्ठ अधिकार्‍याचे प्रकरण शासकीय परवागीसाठी पाठविण्यात आले होते. परंतु, त्यामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. दरम्यान, आरोपपत्र दुरुस्त करून पुन्हा शासकीय परवानगीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे यांनी दिली. त्यामुळे अद्यापही त्या लाचप्रकरणात आरोपपत्र दाखल झाले नसल्याचे समोर आले आहे.