Thu, Jan 28, 2021 08:38होमपेज › Pune › ‘आणिबाणीत तुरूंगवास भोगलेल्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा’

‘आणिबाणीत तुरूंगवास भोगलेल्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा’

Published On: Dec 22 2017 11:33PM | Last Updated: Dec 22 2017 11:33PM

बुकमार्क करा

पुणे : देवेंद्र जैन 

आणिबाणीला विरोध करणाऱ्या सामाजिक आणि राजकिय क्षेत्रातील अनेकांना त्यावेळच्या सरकारने अटक करून तुरुंगात डांबले. तुरुंगवास भोगणाऱ्यांना उत्तर प्रदेश, बिहार राज्यांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देत त्यांना पेन्शन देण्यात येत आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातीलही आणिबाणीच्या विरोधात तुरुंगवास भोगणाऱ्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देण्याबाबत पुढील वर्षीच्या पहिल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर औचित्याच्या मुद्याद्वारे भाजपचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी आणिबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा कधी देणार असा सवाल उपस्थित करत यापूर्वीही मी दोनवेळा याबाबत प्रश्न उपस्थित केल्याची आठवण करून दिली. तसेच आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा केली तर चांगलेच होईल अशी आशा खडसे यांनी व्यक्त केली.

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, खडसे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, तुरुंगवास भोगणाऱ्यांची संख्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून गोळा करावी लागत होती. त्यामुळे यास उशीर होत होता. आता माहिती जमा झाली असून, याबाबतचा निर्णय पुढील वर्षात अर्थात जानेवारीत होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.