होमपेज › Pune › पुणेः अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार   

पुणेः अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार   

Published On: Jan 24 2018 7:16PM | Last Updated: Jan 24 2018 7:16PMउरुळी कांचनः वार्ताहर 

अल्पवयीन गतिमंद मुलीच्या नैसर्गिक असाह्यतेचा फायदा घेत तिच्यावर अज्ञाताने बलात्कार केला. या घटनेत ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. उरुळी कांचन (ता.हवेली) येथे ही घटना घडली आहे. मुलीच्या प्रकृतीस त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,उरुळी कांचन येथे या पिडीत मुलीचे कुटुंब वास्तव्यास आहे. मोलमजुरी करून हे कुटुंब उदर्निवाह करते. कुटुंबियांतील कर्त्या पुरूषांना मोलमजुरी करण्यास बाहेर जावे लागत असल्याने घरात पंधरा वर्षाची मुकबधीर मुलगी एकटीच वास्तव्यास असायची. या संधीचा फायदा घेत अज्ञाताने हे कृत्य केले आहे.  मंगळवार दि.२३ रोजी या अल्पवयीन मुलीची प्रकृती बिघडल्याने मुलीला उपचारासाठी शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर वैद्यकीय अहवालात मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर मंगळवारी रात्री मुलीच्या वडिलांनी पोलिसात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी याबाबत अज्ञात नराधमाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. या कुटूंबियांशी संबंधित व्यक्तीचा या कृत्यात सहभाग असावा असा कयास पोलिसांनी काढला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले करीत आहेत. दरम्यान या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून परिसरात या घटनेबद्दल संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. 

''पोलिसांनी घटना उघडकिस आल्यानंतर सर्व बाजूंनी समांतर तपास सुरू केला आहे. कुटूंबियांशी निगडीत सर्व माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. कुटूंबियांना विश्वासात घेऊन आरोपीचा मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिकांनी सहकार्य करावे." 
- श्रीकांत इंगवले, सहाय्यक पोलिस निरीक्षक