Tue, Aug 11, 2020 21:59होमपेज › Pune › राज्यातील पश्‍चिम घाटात उडत्या सरड्याची प्रथमच नोंद

राज्यातील पश्‍चिम घाटात उडत्या सरड्याची प्रथमच नोंद

Published On: Dec 02 2017 2:08AM | Last Updated: Dec 02 2017 1:59AM

बुकमार्क करा

पुणे : अपर्णा बडे 

राज्यातील पश्‍चिम घाटाचा  भाग असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात प्रथमच सदर्न फ्लाईंग लिझार्ड म्हणजेच उडत्या सरड्याची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी व तळकट या निम्न सदाहरित वन उद्यानात हा सरडा आढळून आला आहे. त्यामुळे  सह्याद्रीच्या डोंगररांगात आणखी संशोधन होणे आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा  अधोरेखीत झाले आहे. मलबार नेचर कॉन्सर्व्हेशन क्लबचे अनिश परदेशी अणि मकरंद नाईक यांनी एकत्रित केलेल्या या संशोधनावरील रिसर्च पेपर नुकताच ’आयआरसीएफ- रेप्टाईल्स अँड अ‍ॅम्फिबियन्स ़क़ॉन्सर्व्हेशन अँड नॅचरल हिस्टरी ’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या सरडयाच्या अधिवासाच्या नोंदींचे यात सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. 

पश्‍चिम घाटातील सह्याद्रीच्या डोंगररांगात वनांचे सर्वेक्षण करताना हा सरडा प्रथम  28 मे 2015 रोजी  तिलारी व तळकट वन उद्यानात दिसून आला. साधरणतः जमिनीपासून 2 मीटर उंचीवर एका झाडावरून दुसर्‍या झाडावर उडताना दिसला. या सरड्याला वटवाघुळ सारखे पंख असल्याचे दिसून आले. हा सरडा  निम्न सदाहरीत जंगलात आढ्ळून येतो. यापूर्वी कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गोवा राज्यातील पश्‍चिम घाट आणि आंध्रप्रदेश राज्यातील निम्न सदाहरीत जंगलातील अधिवास ज्ञात होता.

दरम्यान, प्रथमच महाराष्ट्रातील पश्‍चिम घाटात हा उडता सरडा आढळला आहे. याबाबत अधिक करण्यात आलेल्या संशोधनानंतर या सरड्याची नोंद झाली आहे.  हा सरडा चमकदार रंगाचा असून त्याच्या अंगावर काळ्या रंगाचे शिंगासारखे वर आलेले ठिपके आणि गळ्याखाली पिवळ्या रंगाचे लोंबते कातडे असल्यासारखा दिसतो. आयुसीएनने या सरड्याला ’कमी चिंतेचा ’ दर्जा दिला आहे. देशात या सरड्याच्या इतरत्र नोंदी आढळून आल्या आहेत. मात्र, या संशोधकांनी केलेल्या नोंदीत महाराष्ट्रातील पश्‍चिम घाटात या सरड्याचा आढळ प्रथमच दिसून आला आहे.