Thu, Sep 24, 2020 17:00होमपेज › Pune › इस्रो’सारख्या संस्थांची संख्या कमी का?

इस्रो’सारख्या संस्थांची संख्या कमी का?

Published On: Dec 17 2017 2:20AM | Last Updated: Dec 17 2017 2:20AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी 

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जोरावर सामाजिक बदल मोठ्या प्रमाणावर होत असतात. देशाच्या विकासामध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे. सामाजिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजवाणार्‍या ‘इस्रो’ची कामगिरी आपण पाहू शकतो. मात्र, विज्ञान विषयांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा लाभ समाजाला देणार्‍या संस्थांची संख्या मोजकी असून, भारतीय अवकाश संशोधन संस्थेसारख्या (‘इस्रो’) संशोधन संस्था देशात इतरत्र का दिसत नाहीत, असा प्रश्‍न ‘नीती’ आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी शुक्रवारी उपस्थित केला.

    विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानासाठी दिला जाणार्‍या एच. के. फिरोदिया पुरस्काराचे वितरण डॉ. राजीव कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. फिरोदिया पुरस्काराचे यंदा बाविसावे वर्ष असून, यंदाचा विज्ञानरत्न पुरस्कार ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. ए. एस. किरण कुमार यांना, तर विज्ञानभूषण पुरस्कार विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे (डीएसटी) सचिव डॉ. आशुतोष शर्मा यांना देण्यात आला. 

या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. गोविंद स्वरूप, ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया आणि जयश्री फिरोदिया उपस्थित होते.  डॉ. कुमार म्हणाले की, देशातील संशोधन संस्थांच्या संशोधनातून सामाजिक उत्तरदायित्व असल्याचे क्वचितच दिसून येते. सामाजिक विकासामध्ये थेट भूमिका निभावणार्‍या भारतीय अवकाश संशोधन संस्थेसारख्या (‘इस्रो’) संशोधन संस्था देशात इतरत्र दिसून येत नाहीत. अशा संस्था का निर्माण झाल्या नाहीत, असा प्रश्‍न  कायम सतावतो. 

देशात संशोधन क्षेत्राला मिळणारा निधीही अपुरा आहे. पुढील दशकात देशाच्या विकासाचा वेग वाढवताना विज्ञान - तंत्रज्ञान क्षेत्राची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे संशोधन क्षेत्राला मिळणारा निधी अधिक पटींनी वाढविणे आवश्यक असल्याचे डॉ. कुमार यांनी सांगितले.  अरुण फिरोदिया म्हणाले की, देशातील संशोधन प्रामुख्याने सरकारी संशोधन संस्थांच्या माध्यमातून होत असते. या संशोधनाचा फायदा  नागरिकांना करून देण्यासाठी खासगी उद्योग आणि विद्यापीठांनाही या प्रक्रियेत थेट सहभागी करून घ्यायला हवे. या वेळी कार्यक्रमात डॉ. किरण कुमार, डॉ. शर्मा आणि डॉ. माशेलकर यांनीही मनोगत व्यक्त केले.