Mon, Aug 10, 2020 04:34होमपेज › Pune › पारधी आवास योजनेचा फार्स कागदावरच

पारधी आवास योजनेचा फार्स कागदावरच

Published On: Jan 02 2018 1:51AM | Last Updated: Jan 02 2018 1:33AM

बुकमार्क करा
पुणे ः नवनाथ शिंदे

देशातील प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने 2022 सालचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, बहुचर्चित आणि उपेक्षित असणार्‍या पारधी समाजाच्या आवास योजनेची जिल्ह्यातील कामे धीम्या गतीने सुरू असल्याचा फटका लाभार्थींना बसत आहे. जिल्ह्यात सन 2016-17 अंतर्गत 66 घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी फक्त 22 घरांचे काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित घरांची कामे संथगतीने सुुरू असल्याचे चित्र आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबांना हक्काचा निवारा उपलब्ध होण्यासाठी चार योजना राबविल्या जात आहेत. 

त्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि पारधी आवास योजनेचा समावेश आहे. मात्र, विविध कारणांमुळे चारही आवास योजनांची कामे विविध टप्प्यांत रेंगाळली आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे हक्काच्या घराची आस घेऊन शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविणार्‍या लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः समाजातील उपेक्षित कुटुंबांना आवास योजनेचा फायदा होण्यासाठी प्राधान्य दिले जाते. मात्र, योजना राबविताना आणि अनुदानाचे वितरण करताना अनेक अडचणींचा सामना सर्वसामान्य कुटुंबांना करावा लागत आहे. जिल्ह्यात पारधी आवास योजनेंतर्गत 2016-17 मध्ये 66 घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. 

त्यापैकी 56 लाभार्थींच्या बँक खात्याची खात्री करण्यात आली आहे, तर पहिल्या टप्प्यातील 55 लाभार्थींना अनुदान वितरित केले आहे. अनुदान वितरणाची आकडेवारी 85 टक्के आहे, तर दुसर्‍या टप्प्यात 49 लाभार्थींना अनुदान वितरित करण्यात आले आहे. सुमारे  75 टक्के अनुदान लाभार्थींना देण्यात आले आहे. तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यात 20 लाभार्थींना अनुदान वितरित करण्यात आले आहे. शेवटच्या टप्प्यात 30 टक्के लाभार्थींच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यात आले आहे.     पारधी आवास योजनेंतर्गत 2016-17 अंतर्गत फक्त 22 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे, तर 44 लाभार्थींच्या घराचे स्वप्न अद्यापही पूर्ण होणे बाकी आहे.  जिल्ह्यातील आंबेगाव, भोर, हवेली, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी आणि वेल्हे तालुक्यांत एकाही पारधी समाजातील कुटुंबाला योजनेचा लाभ देण्यात आला नाही. बारामतीतील 4 घरांच्या उद्दिष्टापैकी 2 घरांची  कामे पूर्ण झाली आहेत. 

दौंडमधील 44 पैकी 14 घरांची कामे झाली आहेत, उर्वरित 30 घरकुलांची कामे संथगतीने सुरू आहेत. इंदापूरमधील 11 घरांच्या उद्दिष्टापैकी 2 घरांचे काम पूर्ण झाले आहे. पुरंदरमध्ये दोन घरांच्या उद्दिष्टाचे काम पूर्ण झालेले नाही. शिरूरमध्ये 5 पैकी 4 घरांची कामे पूर्ण झाली आहेत.