Thu, Aug 13, 2020 17:09होमपेज › Pune › तुरळक घटना वगळता पुण्यात बंद शांततेत

तुरळक घटना वगळता पुण्यात बंद शांततेत

Published On: Jan 04 2018 2:03AM | Last Updated: Jan 04 2018 2:03AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पाळलेल्या बंदला पुणे शहरात प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी तोडफोडीच्या तुरळक घटना वगळता शहरात शांतता होती. दरम्यान, पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरात सोळा ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या असून, त्यात 6 बस आणि 12 खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. तर, लहान-मोठे मिळून 70 मोर्चे निघाले आहेत. तसेच, एकूण 21 ठिकाणी रास्ता रोको कारण्यात आला, अशी माहिती पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली. शहरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

कोरेगाव भीमा येथे सोमवारी दोन गटांत झालेल्या वादातून दंगल उसळली. त्यानंतर बुधवारी नेते प्रकाश आंबेडकर आणि विविध संघटनांकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. याबंदला पुणे शहरात प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध भागांत सकाळपासूनच संघटनेचे कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली. रास्ता रोको करीत मोर्चे निघाल्यानंतर काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर पीएमपीएमएल बस आणि खासगी वाहतुकीवर परिणाम झाला.  दुपारी पीएमपी, परिवहन, तसेच खासगी वाहतूक बंद करण्यात आली. दरम्यान, काही ठिकाणी सुरू असणारी दुकाने दुपारी कार्यकत्यार्र्ंकडून बंद करण्यात आली. शहरात पीएमपीएमएल आणि खासगी वाहतूक सकाळी अकरापर्यंत सुरळीत सुरू होती.

वेगवेगळ्या ठिकाणी चौकांमध्ये विविध संघटनांकडून रास्ता रोको करीत मोर्चे काढण्यात आले. रास्ता रोकोमुळे काही वेळ त्या-त्या  भागात वाहतूककोंडी झाली होती. मात्र, मोर्चे निघाल्यानंतर पोलिसांकडून वाहतूक पूर्वपदावर आणली.  दरम्यान, पुण्याच्या मध्यवस्तीत,  तसेच काही ठिकाणी सुरू असणारी दुकाने बंद करण्यात आली.  पुणे पोलिसांकडून सकाळपासूनच कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकार्‍यांसह स्थानिक पोलिस रस्त्यांवर तैनात होते. चंदननगर परिसरात दोन गट समोरा-समोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच धाव घेतली. त्यामुळे तणाव निवळला. शहरात दगडफेकीच्या घटना वगळता शहरात सर्वत्र शांतता होती. 

दिवसभरात 70 मोर्चे निघाले

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 25 ते 500 लोकांपर्यंतचे दिवसभरात एकूण 70 मोर्चे निघाले, तर दगडफेकीच्या 16 घटना घडल्या.  त्यात 6 पीएमपीएमएल आणि 12 खासगी वाहनांची तोडफोड झाली. तसेच, तीन ठिकाणी पथारी व्यावसायिकांना हुसकावून गाडे बंद करण्यात आले. एकूण 21 ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला असून, दोन ठिकाणी रस्त्यावर टायर जाळण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली. तसेच, नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहनही शुक्ला यांनी केले आहे. शहरात कोठेही लाठी चार्ज करण्यात आलेला नाही.

एकबोटे यांच्या घरासमोर घोषणाबाजी

दांडेकर पुलावर रास्ता रोको सुरू असतानाच मिलिंद एकबोटे यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल, असे समजल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांकडून समजूत काढण्यात आली. त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला. मात्र, सुरक्षितेतच्या कारणावरून मिलिंद एकबोटे यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यातच दुपारी एकबोटे यांच्या घरासमोर काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत तेथे निदर्शने केली. त्यामुळे काही काळ याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. दरम्यान गिरीश बापट यांच्या घरावर मोर्चा निघाला, अशी अफवा काही वेळांतच पसरली. तो मोर्चा टिळक रोडवरून डेक्कन चौकात आला. त्यानंतर संभाजी महाराज पुतळ्यापासून नदीपात्रमार्गे नारायणपेठेतून एबीसी चौकात गेला. बापट यांच्या घराकडे न जाता तो शनिवारवाड्यापासून मोर्चा पुढे गेला. बापट यांच्या घराकडे मोर्चा येणार असल्याचे समजल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली होती.