Tue, Jan 19, 2021 18:18होमपेज › Pune › 'पवनाथडी जत्रा स्‍थगित करण्‍याची मागणी'

'पवनाथडी जत्रा स्‍थगित करण्‍याची मागणी'

Published On: Dec 28 2017 12:03PM | Last Updated: Dec 28 2017 12:03PM

बुकमार्क करा

पवनाथडी आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात येणार्‍या पवनाथडी जत्रेतील स्टॉलसाठी पालिकेने 'लकी ड्रॉ' काढले आहेत. मात्र, पवनाथडी जत्रेतून फलनिष्पत्ती होत नाही, महिला बचत गटांना फायदा होत नाही. त्यामुळे पवनाथडी जत्रा स्थगित करण्याची मागणी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केल्याने यावेळची पवनाथडी होणार की नाही,  याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेतर्फे महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. यंदाचे हे ११ वे वर्ष आहे. यंदा सांगवीतील पीडब्लूडी मैदान येथे ४ ते ८ जानेवारी २०१८ या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले. 

या जत्रेत स्टॉल मिळण्यासाठी पालिकेने बचत गटांकडून अर्ज मागविले. पालिकेकडे एक हजार १२ अर्ज प्राप्त झाले होते. पालिका या जत्रेत ४३६ स्टॉलची उभारणी करणार आहे. त्यासाठी बुधवारी उपमहापौर शैलजा मोरे आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता तापकरी यांच्या हस्ते 'लकी ड्रॉ' काढण्यात आले. यामध्ये १ ते ५ स्टॉल अपंग महिलांकरिता राखीव ठेवण्यात आले असून ६ ते २२२ स्टॉल वस्तू विक्रीचे आहेत. तर २२३ ते ३३० असे एकूण १०७ स्टॉल शाकाहारी खाद्य पदार्थाचे असून ३३१ ते ४३६ असे एकूण १०७ स्टॉल मांसाहारी खाद्यपदार्थांचे आहेत. परंतु, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी पवनाथडीच्या फ्लनिष्पत्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत पवनाथडी नकोच अशी भूमिका घेतल्याने व तसे पत्र आयुक्तांना दिल्याने पवनाथडी होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत, दैनिक पुढारीशी बोलताना भाजप शहराध्यक्ष आमदार जगताप म्हणाले, पवनाथडी जत्रेसाठी दरवर्षी माझ्या माहितीप्रमाणे साधारण 40 ते 45 लाख रुपये खर्च होतो. यावर्षी महापालिकेने ८० लाख रुपये खर्च दाखवला असून कदाचित यापेक्षा जास्त खर्च होऊ शकतो. मांडवावर ३० लाख रुपये, कलाकारांवर २० लाख रुपये हे बजेट पाहून चक्रावून जायला होते. मागील अनुभव पाहता एवढा खर्च करून फलनिष्पत्ती होईल, या उपक्रमातून बचतगटांना लाभ होईल, असे वाटत नाही शहरातील महिला बचत गटांपेक्षा बाहेरचे गटच स्टॉल मिळवतात. त्यातही फक्त खाद्यपदार्थांचेच स्टॉल असतात ही वस्तुस्थिती पाहता पवनाथडी स्थगित करणेच उचित ठरेल, असे जगताप म्हणाले.

भाजपचे शहराध्यक्ष आमदार जगताप यांच्या पवनाथडी बाबतच्या या भूमिकेमुळे आता पालिका प्रशासन लकी ड्रॉ काढल्यानंतर देखील पवनाथडी जत्रा स्थगित करते की भरविते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.