Thu, Aug 13, 2020 16:50होमपेज › Pune › वनडे बार’मधून २५ लाखांचा कर 

वनडे बार’मधून २५ लाखांचा कर 

Published On: Jan 02 2018 1:51AM | Last Updated: Jan 02 2018 1:30AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

नववर्षाच्या स्वागतासाठी ‘थर्टी फर्स्ट’ला रविवारी रात्री मद्यप्राशन करण्यासाठी एकदिवसीय मद्यविक्रीचा परवाना देण्यात आला होता. पुणे शहर आणि उपनगरांमध्ये सुमारे 250 एकदिवसीय मद्यालये सुरू करण्यात आली होती. त्यातून उत्पादन शुल्क विभागाला सुमारे 25 लाखांचा अबकारी कर मिळाला आहे. शहर आणि जिल्ह्यात सुमारे 2 हजार 600 सर्व प्रकारची मद्यालये आहेत. मात्र, नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त 31 डिसेंबरला रात्री शहर व जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्री अथवा पार्टीमध्ये मद्य पुरवण्यासाठी एक दिवसीय परवाना  दिला होता. शहर आणि उपनगरांमधून 250 हॉटेल्स, रेस्टॉरन्ट आणि पार्टीचे आयोजन करणार्‍यांनी एकदिवसीय परवाना घेतला  होता.

या पार्ट्यांसाठी हॉटेल, क्लब आणि रिसॉर्टमध्ये मद्य पुरविण्यात आले. आयोजकांनी विविध आकर्षक योजना आणल्या होत्या. पार्टीमध्ये 100 पेक्षा कमी लोक येणार असतील तर 10 हजार 50 रुपये आणि 100 पेक्षा अधिक लोक येणार असतील तर 15 हजार 50 रुपये शुल्क भरून परवाना घेतला होता. यातून सुमारे 25 लाख रुपयांचा अबकारी महसूल  मिळाला आहे. ज्यांनी परवाना घेतला आहे त्या ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी अचानक भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच  पार्ट्या, हॉटेल्स, परमिट रूममधून बनावट मद्य पुरविण्याची शक्यता होती. हे रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची आठ आणि इतर दोन पथके कार्यरत होती, अशी माहिती उपअधीक्षक सुनील फुलपगार  यांनी दिली.