Mon, Aug 10, 2020 05:20होमपेज › Pune › शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

Published On: Jan 02 2018 5:57PM | Last Updated: Jan 02 2018 5:57PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

हिंजवडी ते शिवाजीनगर या तब्बल २३ कि.मीच्या मेट्रोला आज राज्याच्या मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. तब्बल ८३१३ कोटी रुपयांचा हा प्रकल्प अवघ्या ४८ महिन्यांत पुर्णत्वास जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे.

ते म्हणाले, 'हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोमार्गावर एकूण २३ स्थानके असतील. सार्वजनिक व खासगी सहभागाने दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन आणि पी.एम.आर.डी.ए. यांच्यामार्फत हा प्रकल्प राबविला जाणार आहे.  दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने नोव्हेंबर २०१६ मध्ये या प्रकल्पाचा आराखडा तयार केला तो डिसेंबर २०१६ मध्ये पी.एम.आर.डी.ए.च्या सभेत मंजूर करण्यात आला.' 

या प्रकल्पाचा कालावधी ४८ महिन्यांचा असून तीन डब्यांच्या मेट्रोतून एका वेळी ७६४ प्रवासी प्रवास करु शकतील. बापट पुढे म्हणाले, 'सन २०२१ मध्ये २ लाख ६१ हजार प्रवाशांना या सेवेचा लाभ मिळेल. या प्रकल्पाचा एकूण खर्च ८३१३ कोटी रुपये असून त्यापैकी केंद्र सरकार ११३७ कोटी रुपये देणार आहे. तर राज्याचा वाटा ८१२ कोटी रुपयांचा असणार आहे आणि उर्वरित रक्कम खासगी भागीदारीतून उभी केली जाणार आहे. मेट्रोचा पहिला टप्पा स्वारगेट ते पिंपरी व वनाज ते रामवाडी हा प्रगती पथावर असून पहिल्या टप्प्यातील ३१ कि.मी. मार्गाला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे.  मेट्रोचा विविध प्रकल्पांसाठी नव्या वर्षात साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी अपेक्क्षित आहे.  शासनासह विविध वित्तीय संस्थांकडून हा निधी मिळेल. ५० लाखाहून अधिक पुणेकरांना महामेट्रोचा लाभ मिळणार असून या प्रकल्पाची कामे वेळेपूर्वीच संपविण्याचा आमचा इरादा आहे.'