Fri, Oct 30, 2020 07:55होमपेज › Pune › वारज्यात एटीएमसह इलेक्ट्रिक दुकान जळून खाक

वारज्यात एटीएमसह इलेक्ट्रिक दुकान जळून खाक

Published On: Dec 02 2017 2:09AM | Last Updated: Dec 02 2017 1:28AM

बुकमार्क करा

पुणे /वारजे : प्रतिनिधी 

वारजे माळवाडी गणपती माथा परिसरात असलेल्या सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समधील इलेक्ट्रिक दुकान आणि आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमला गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली. या आगीत इलेक्ट्रिक दुकानातील साहित्य व आयसीआयसीआय बँकेचे एटीएम पूर्णत: जळून खाक झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली आहे. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, वारजे माळवाळी परिसरातील गणपती माथा येथे कोकणे (वय 57, रा. वारजे, पुणे) यांच्या मालकीचे दुकान भाडेतत्वावर मदनसिंह चौहान यांना दिलेले होते. चौहान यांचा इलेक्ट्रिक वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. या दुकानात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक साहित्य होते. तर दुकाना शेजारी आयसीआयसीआय बँकेचे एटीएम भाडेतत्वावर होते.

इलेक्ट्रिक दुकानातून गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास  मोठ्या प्रमाणात धुराचे लोट येत असल्याचे इमारतीमधील रहिवासी नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी स्थानिक पोलिस व अग्निशमन दलास कळविले. कोथरूड आणि सिंहगड रस्ता येथील अग्निशमन दलाचे फायरमन पंढरीनाथ उभे, विजय सुतार व चालक विजय शिंदे यांनी शर्थीचे परिश्रम करत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या आगीत दुकानामध्ये असलेल्या  इलेक्ट्रिक साहित्यासह आयसीआयसीआय बँकेचे एटीएमदेखील जळून खाक झाले. त्यात एकूण सात ते  आठ लाख रुपयांचे  नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा  प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. याबाबत वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुकानात गुरुवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या आगीत  लाखो रुपयांचे नुकसान झाले असून एटीएम मशिनही जळाले आहे. मात्र एटीएममध्ये रोकड किती होती याबाबत अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही. दरम्यान, सहकारनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी जनता सहकारी बँकेचे एटीएम मशिन जळून खाक झाले होते.