Thu, Sep 24, 2020 16:13होमपेज › Pune › डोणजेच्या महिलेचा ‘दमा’ पळाला

डोणजेच्या महिलेचा ‘दमा’ पळाला

Published On: Dec 17 2017 2:20AM | Last Updated: Dec 17 2017 2:15AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी

तिला गेली पंधरा वर्षापासून दम्याचा त्रास असल्याचा डॉक्टरांचा आणि तिचाही समज. दीड महिन्यापूर्वी दम लागत असल्याने ‘ती’ सिंहगडाच्या पायथ्याला डोणजे गावातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. पण, डॉक्टरांनी तिला स्टेथो लावून तपासले असता मात्र हा आजार दम्याचा नसून ह्रदयाचा असल्याचे आढळले. या महिलेवर ससून रुग्णालयात 15 दिवसांपुर्वी यशस्वी ह्रदयशस्त्रक्रिया झाली असून आता मात्र तिचा तथाकथित ‘दमा’ कायमचा पळून गेला आहे. 

छबुबाई ढेबे, वय 45, रा. डोणजे परिसर असे या महिलेचे नाव आहे. ढेबे हे मोलमजूरी करून उदरनिर्वाह करणारे दांपत्य. ढेबे यांना दम लागत असल्याने त्या दीड महिन्यापूर्वी डोणजे गावातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या. तेथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गोपाळ गावडे यांनी स्टेथो लावून तपासले असता त्यांना ह्रदयाचा ‘लब ढब’ ऐवजी वेगळाच आवाज आला. तिला ह्रदयरोगाची शक्यता असल्याने डॉक्टरांनी खाजगी प्रयोगशाळेकडे सोनोग्राफी करावयास सांगितले. ही तपासणी केल्यावर या महिलेची ‘मरमर’ अर्थात ‘रुमटीक व्हाल्विलार हार्ट डिसिज’ असल्याचे निदान झाले ज्यामध्ये ढेबे यांच्या ह्रदयाची डाव्या बाजूची झडप बारीक होती.

 पण बाहेर यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन लाखापेक्षा अधिक खर्च येणार आणि हे हातावरील पोट असणार्‍या कुटूंबाला ते परवडणे तर अशक्य. मग डॉ. गावडे यांनी त्यांना ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. येथे आल्यावर या महिलेवर रूग्णालयाचे ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत कोकणे आणि सहका-यांनी 15 दिवसांपूर्वी ‘बलून व्हाल्वोटॉमी’ ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या आणि पूर्णपणे मोफत केली. ढेबे यांचा 15 वर्षापासूनचा ‘दमा’ बरा झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे, अशी माहिती ससूनचे ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत कोकणे यांनी दिली.    दमा आणि ह्रदयाचा ‘मरमर’ या दोन्ही आजारांमध्ये रुग्णाला दम लागत असल्याने रुग्णाला बहुदा दमा असल्याचे चुकीचे निदान केले जाते. याचे निदान करणे तसे गोंधळाचे असते. हा आजार तरूणपणात होउ शकतो आणि उतारवयात त्याचा त्रास वाढतो, अशी माहिती डॉ. गोपाळ गावडे यांनी दिली.