Sat, Dec 05, 2020 22:57होमपेज › Pune › मेट्रोच्या प्रभाव क्षेत्राचा निर्णय शासनाकडे प्रलंबित 

मेट्रोच्या प्रभाव क्षेत्राचा निर्णय शासनाकडे प्रलंबित 

Published On: Dec 23 2017 2:29AM | Last Updated: Dec 23 2017 2:28AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

नळस्टॅाप येथील दुहेरी पुलाच्या बांधणीसाठी सुमारे 56 कोटींच्या निधीची आवश्यकता असणार आहे. त्यातील 30 कोटी महानगरपालिका देणार असून उर्वरित 26 कोटी महामेट्रो देणार आहे. प्रथम 5 कोटी महामेट्रोने भरल्यानंतर या कामाला सुरुवात होणार आहे. मेट्रोचे प्रभावक्षेत्र अजून निश्‍चित करण्यात आले नसून सध्या त्याचा निर्णय राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. ते ठरल्यानंतरच महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार अतिरिक्त चटई क्षेत्र आणि इतर लाभ नागरिकांना मिळणार असल्याचे महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

पुणे मेट्रोच्या भूमीपूजनाला येत्या 24 डिसेंबरला वर्षपूर्ती होत आहे. त्यानिमित्ताने वर्षभरातील मेट्रोच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी व्हिडिओ कॅानफरन्सद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. नागपूर मेट्रोच्या पहिल्या व्हायडक्ट सेगमेन्टचे काम पूर्ण होण्यास 22 महिन्यांचा कालावधी लागला होता. मात्र, पुण्यात हेच काम अवघ्या 12 महिन्यांत पूर्ण झाले आहे. ही जलद प्रगती नागरिक, प्रशासन आणि लोकनेते यांच्या सहकार्याने शक्य झाली आहे. पुढील दोन वर्षांत हे काम झपाट्याने पूर्ण करण्यात येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

अ‍ॅग्रिकल्चरल कॅालेज, शिवाजी नगर सिव्हिल कोर्ट येथील जागाही आम्हाला मिळाल्या असून त्याचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. भुयारी मेट्रोचे काम सुरू करण्यासाठी लागणारी अभ्यास प्रक्रियाही सध्या सुरू आहे. ज्या ठिकाणी रस्ते अरुंद आहेत, त्याठिकाणी मेट्रो भुयारी करण्याचे योजण्यात आलेले आहे. त्याशिवाय ज्या इमारती जुन्या आहेत, त्यांचा अभ्यास करणे सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 2019 पर्यंत पहिल्या दोन मार्गिका पूर्ण करून लाईटस्, इलेक्ट्रिकलची कामे यांसारखी उर्वरित कामे हाती घेतली जाणार असल्याची माहिती दीक्षित यांनी दिली आहे.