Mon, Jan 18, 2021 10:17होमपेज › Pune › कोरेगाव भीमा पूर्वपदावर

कोरेगाव भीमा पूर्वपदावर

Published On: Jan 04 2018 2:03AM | Last Updated: Jan 04 2018 1:55AM

बुकमार्क करा
पुणे/कोरेगाव भीमा : प्रतिनिधी

कोरेगाव भीमा ग्रामस्थांच्या वतीने मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (दि. 3) शांतता बैठक ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. या वेळी युवावर्गाने सोशल मीडियावर येणार्‍या कोणत्याही पोस्टला पाठिंबा न देता गावामध्ये शांतता कशी प्रस्थापित होईल याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने केले. या वेळी या दंगलीला कोरेगाव भीमाचा कोणताही संबंध नसतानासुद्धा ग्रामस्थांच्या घरांचे, दुकानांचे व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांनी संपूर्ण कायदेशीर बाबींची पूर्तता करावी, असे आवाहन ज्येष्ठ नागरिकांनी केले.

तत्पूर्वी मंगळवारी (दि. 2) रात्री गावातील दलित समाज व ग्रामस्थांच्या वतीने शिक्रापूर पोलिसांना एकीचे निवेदन देण्यात आले. यामध्ये गावातील प्रत्येक विकासकामात, सामाजिक, सांस्कृतिक व इतर कार्यक्रमांना प्रत्येक व्यक्ती जातपात न मानता एकत्र येत असून, आमच्या दोन्ही गटांत कोणताही वाद यापूर्वी नव्हता व आताही नाही, अशा प्रकारची निवेदने देण्यात आली आहेत. यावर दलित समाजातील नागरिक, कोरेगाव भीमा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सह्या आहेत. 

ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण शांतता बैठकीला सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच कल्पना गव्हाणे, माजी सरपंच विठ्ठल ढेरंगे, विजय गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तुकाराम सात्रस, ग्रामपंचायतीचे सदस्य व इतर ग्रामस्थ व युवक उपस्थित होते. मागील दोन-तीन दिवसांपासून दंगलीने भयभीत असलेले जनजीवन बुधवारी दुपारनंतर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शांतता समितीच्या बैठकीनंतर गावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने उघडून एकीचे दर्शन घडविले. सुरुवातीला मेडिकल, दूध डेअरी, किराणा स्टोअर अशी दुकाने सुरू झाली असून, ज्या दुकानांच्या या दहशतीत काचा फुटून नुकसान झाले आहे अशांनी दुरुस्त्या सुरू केल्या आहेत.

तर, गावातील अनेक चौकांमध्ये लहान मुलेदेखील आता रस्त्यावर आली असून, अनेक महिलांनी पोलीस प्रशासन, दंगल नियंत्रण पथक व राज्य राखीव दलाच्या पोलिसांचे गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. दर तासाला मुख्यमंत्री कार्यालयात अहवाल कोरेगाव भीमा येथील दोन गटांतील घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यावर मुख्यमंत्री कार्यालयाचे लक्ष असून, जिल्हा प्रशासनाच्या वतीने दर  तासाला जिल्ह्यातील परिस्थितीचा अहवाल सादर केला जात आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी दिली. दरम्यान, बुधवारी महाराष्ट्र बंदच्या काळात कोरेगाव भीमासह परिसरात संपूर्ण शांतता होती. असेही त्यांनी सांगितले.