Sat, Nov 28, 2020 19:46होमपेज › Pune › दारु आणून न दिल्याने खून; दोघांना अटक

दारु आणून न दिल्याने खून; दोघांना अटक

Published On: Jan 04 2018 2:07AM | Last Updated: Jan 04 2018 2:07AM

बुकमार्क करा
पुणे ः प्रतिनिधी 

दारू आणून न दिल्याचा राग मनात धरून एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून करणार्‍या दोघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना 8 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. विकी चंद्रकांत पवार (24), अजित सुभाष पवार (21, रा. दोघेही रा. जनता वसाहत, पर्वती), अशी पोलिस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. सागर अशोक जाधव (20, रा. सनसिटी) याचा पोलिस शोध घेत आहे. याबाबत कुणाल दिलीप वाघमारे (23, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

दि. 1 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी कुणाल वाघमारे यांचे चुलते विजय उर्फ बापू व त्यांचे मित्र दाद्या उर्फ चंदू पवार हे दोघे एकत्र असताना विजय यांना आरोपींनी दारू आणण्यास सांगितले. परंतु, त्यांनी दारू न दिल्याने आरोपींनी त्यांना गंभीर मारहाण केली. मारहाणीत डोक्यावर पडल्याने तसेच गळा दाबून खुनाचा प्रयत्न झाल्याने याप्रकरणी बापू वाघमारे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  याप्रकरणी आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. परंतु, उपचारादरम्यान बापू वाघमारे यांचा मृत्यू झाल्याने दोघांना खून प्रकरणी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता सरकारी वकील एस. ए. क्षीरसागर यांनी फरार असलेल्या एकाला अटक करायची आहे, गुन्हा करताना एकाने गळा दाबल्याने बोटाचे ठसे घेणे बाकी असल्याने पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने ती मंजूर केली.