पिंपळगावची शाळा बंद; परंतु शिक्षण सुरू

Last Updated: Jul 05 2020 1:25AM
Responsive image


मंचर : संतोष वळसे-पाटील  

पिंपळगाव तर्फे महाळुंगे (ता. आंबेगाव) येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी  कोरोना  संसर्गाच्या काळात  घरी असले तरी त्यांना ऑनलाइन शिक्षण मिळत आहे. ‘स्काइप इन द क्लास रूम’ या उपक्रमांतर्गत ‘शाळा बंद, परंतु शिक्षण सुरू’ हे  शक्य झाले आहे. 

शाळेतील शिक्षिका मृणाल गांजाळे यांनी हा उपक्रम सलग दोन वर्षे या शाळेत सुरू ठेवला. त्यामुळे गांजळे यांची मायक्रोसॉफ्टच्या ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील जागतिक शिक्षण परिषदेसाठी निवड झाली आहे.

गांजळे यांच्या  कामाचे स्वरूप पाहता मायक्रोसॉफ्ट कंपनीतर्फे पिंपळगाव शाळेसाठी ऑनलाइन स्वरूपातील मायक्रोसॉफ्ट टिमस नावाचे 50 हजार रुपयांचे ऑनलाइन सॉफ्टवेअर  मोफत दिले आहे.  मायक्रोसॉफ्टने प्रथम सर्व शिक्षकांना प्रशिक्षण  दिले. ‘काहुत सॉफ्टवेअर’द्वारे विद्यार्थांना वेगवेगळ्या गेम्स खेळता येतात, ज्यातून मुलांना शिक्षण मिळते. याच माध्यमातून मुले इतर देशांना भेटी देतात.

शिक्षकांच्या या उपक्रमामुळे  पिंपळगाव शाळेसाठी  अमेरिकेतून वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसे मिळाली. या सॉफ्टवेअरच्या मदतीने सध्या तोंडी कामात मदत होते. ‘वेकलेड’ या सॉफ्टवेअरद्वारे शिकविताना शिक्षकांना रिसोर्सेस उपलब्ध होतात. अशा प्रकारे लॉकडाऊन काळातदेखील शिक्षक विद्यार्थांशी जोडलेले आहेत. शिक्षण सुरू आहे. कोरोना काळात शाळा बंद असली तरी ऑनलाइन शिक्षण मिळत आहे. घरबसल्या विद्यार्थी शिक्षण घेत असून आपल्या शंकांचे ते निरसन करत आहेत.

मृणाल गांजाळे  यांच्यासह  शिक्षक सुधीर चिखले, शशिकांत थोरात, माणिक बाजारे, सचिन पालेकर, सुनील वाघ, मच्छिंद्र चासकर, आरती निमोणकर, मोनिका थोरात, अनिता पोखरकर, रोहिणी लोंढे, शशिकला साबळे, वैशाली इंदोरे आदी शिक्षक हा उपक्रम राबवतात. यासाठी मुख्याध्यापक कांतिलाल दंडवते, केंद्रप्रमुख विजय सुरुकुले, विस्तार अधिकारी संचिता अभंग आणि गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन यांचे मार्गदर्शन मिळते. शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावकरी  या ऑनलाइन शिक्षण पद्धतीचे भरभरून कौतुक करत आहेत. पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थांची साथ मिळल्याने हे शक्य झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.

हे आहेत ऑनलाइन उपक्रम

प्रत्येक विद्यार्थाचा शिक्षकास ऑफिस 365 आयडी मिळाला आहे. मायक्रोसॉफ्टच्या मदतीने वेगवेगळ्या गेस्ट स्पीकरचे सेशन आयोजित करून आभासी क्षेत्रभेटीद्वारे विद्यार्थांना सोलापूरचे विज्ञान केंद्र जगप्रसिद्ध शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी दाखवले. 

लर्निंग विथ लॉकडाऊन हा उपक्रम केला. विद्यार्थांनी वेगवेगळी पोस्टर बनवली. रशियाची संस्कृती  ही आभासी क्षेत्रभेट आयोजित  केली. त्यामध्ये आयुष  पोखरकर या  विद्यार्थ्याने स्वतःच्या घरातला गोठा दाखवला आणि तो रशियातील नागरिकांना खूपच आवडला. 

पोर्तुगाल सोबत प्लास्टिक बि—ज प्रकल्प, तैवान शाळेची भेट, व्हिएतनामसोबत मिस्त्री स्काईप, ब—ाझील, थायलंड शाळेसोबत संवाद, दिल्‍लीतील शिवानी रावत व्यंकटेश्‍वर स्कूलमार्फत योगा डे, हेल्दी फूड  असे वेगवेगळे प्रकल्प राबविण्यात आले.