Wed, Sep 23, 2020 08:21होमपेज › Pune › विकासकामांत ‘रिंग’चा बाजार 

विकासकामांत ‘रिंग’चा बाजार 

Published On: Dec 18 2017 2:40AM | Last Updated: Dec 18 2017 2:14AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

शाहूनगर, चिंचवड येथील बहिरवाडे मैदानास सीमाभिंत घालण्याचा 42 लाख रुपयांच्या कामासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेस एकूण 8 ठेकेदारांच्या निविदा प्राप्त असताना त्यातील 5 ठेकेदारांना नाहक अपात्र ठरविण्यात आले. तर, ‘रिंग’मध्ये ठरलेल्या तीन ठेकेदारांमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण केली गेली. या तिन्ही ठेकेदारांना 1, 2 व 3 टक्के जादा दराने निविदा भरली आहे. या प्रक्रियेत ‘रिंग’ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे ‘पारदर्शकते’चा टेंभा मिरवणार्‍या भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. 

प्रभाग क्रमांक 9 मधील शाहूनगर येथील क्रीडांगणास सीमा भिंत बांधणे व इतर अनुषंगिक कामांची ‘ई-निविदा’ प्रक्रिया महापालिकेच्या स्थापत्य विभागाने राबविली. त्यासाठी तन्मय एन्टरप्रायजेस, डी. एस. कुलकर्णी, एच. एम. कन्स्ट्रक्शन, शरदचंद्र वसंतराव गोते, शिवम एन्टरप्रायजेस, महेंद्र भालेराव, कुबेरा एन्टरप्रायजेस आणि राज अर्थमुव्हर्स अ‍ॅण्ड ट्रान्स्पोर्ट या 8 ठेकेदारांच्या निविदा प्राप्त झाला. त्या निविदा प्रक्रियेवर संबंधित स्थापत्य विभागाच्या अधिकार्‍यांच्या सह्या आहेत. असे असतानाही 5 ठेकेदारांना कुठलेही कारण न देता अपात्र ठरविले. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार महापालिका प्रशासनाने केला नाही.

 तसेच, ‘ई-मेल’द्वारेही विचारणा केली नाही. 
महेंद्र भालेराव, शिवम एन्टप्रायजेस व शरदचंद्र गोते या तिघांचा निविदा पात्र ठरविण्यात आल्या. विशेष म्हणजे या तिघांच्या निविदा दर अनुक्रमे 1, 2 व 3 टक्के जादा दराने आहेत. त्यामुळे या निविदेमध्ये ‘रिंग’ झाल्याचे उघड होत आहे. या तीनही निवविदा एकाच संगणकावरुन भरण्यात आल्याचेही समोर आले आहे. तर दुसरीकडे, महापालिकेनेच अपात्र ठरवलेल्या 2 ठेकेदारांना यादीतील यासारख्याच दुसर्‍या विषयाच्या निविदा कामासाठी मात्र, पात्र ठरविण्यात आले आहे. पदाधिकार्‍यांच्या दबावामुळे अधिकार्‍यांनी हा प्रकार केला  आहे, असा आरोप केल्याचा आरोप अपात्र ठेकेदारांनी केला आहे. त्यात आणखी एक गंभीर बाब म्हणजे पात्र ठरलेल्या तिघांपैकी दोन ठेकेदारांनी गेल्या वर्षांभरात महापालिकेत एकही काम केलेले नाही. असे असतानाही त्यांना अटी व शर्तीमध्ये बसवून त्यांना पात्र ठरविण्यात आले आहे. मुळात ई निविदा प्रक्रियेत पात्र ठेकेदारच सहभागी होत असताना त्यांना कागदपत्रांच्या आधारावर अपात्र ठरविताच येत नाही व जरी कागदपत्रे नसली तरी त्यानां पत्र देवून ती सादर करण्याची मुदत दिली जाते,   

महापालिका पदाधिकारी व अधिकार्‍यांच्या या ‘अर्थपूर्ण’ मिलीभगतमुळे महापालिकेचे लाखो रूपयांचे नुकसान होत असून, नागरिकांच्या कररूपी पैश्यांची उधळपट्टी केली जात आहे. या प्रकरणातून भाजपा पदाधिकार्‍यांचा ‘पारदर्शक’ कारभार उघड झाला असून, त्याचप्रकारे इतरही कामांच्या निविदामध्ये ‘रिंग’ झाल्याचा संशय निर्माण होत आहे. या सर्व नियमांना या बेकायदा निविदा प्रक्रियेत फाटा देण्यात आल्याचे पुराव्यानिशी समोर आले आहे. 

ठेकेदार फेडरेशन आयुक्तांकडे तक्रार करणार 
शाहूनगरातील क्रीडांगणास सीमाभिंत बांधण्याच्या ‘ई-निविदा’ कामासाठी प्राप्त असतानाही नाहक पाच ठेकेदारांना अचानक अपात्र ठरविण्यात आले. उर्वरित 3 ठेकेदारांमध्ये ‘रिंग’ होऊन त्यांना काम देण्यात आले. या संदर्भात चौकशी करून निविदा प्रक्रीयेतील संबंधित दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे पिंपरी-चिंचवड महापालिका ठेकेदार फेडरेशन सोमवारी (दि.18) करणार आहे. त्यांनी दखल घेऊन कारवाई न केल्यास वेळेप्रसंगी न्यायालयात जाऊ, असे फेडरेशनच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.