Fri, Sep 25, 2020 11:48होमपेज › Pune › कात्रजमध्ये भिशीच्या पैशासाठी सख्ख्या भावांनी केली निर्घृण हत्या

कात्रजमध्ये भिशीच्या पैशासाठी सख्ख्या भावांनी केली निर्घृण हत्या

Published On: Jul 31 2018 7:55AM | Last Updated: Jul 31 2018 9:08AMपुणे : प्रतिनिधी

कात्रज भागात वर्दळीच्यावेळीच दोन सख्ख्या भावांनी फिल्मी स्टाईलने घरात घुसुन सत्तूरने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान नागरिकांनीच धाडस दाखवून एकाला पकडत चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. कात्रज भागात रात्री १० वाजता वर्दळच्या वेळीच हा थरार घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. तर, वाचविण्यासाठी आलेली पत्नीही या घटनेत जखमी झाली आहे.

चंदन गोबरीया मुरावत (चव्हाण) (वय 35, रा. अंजली नगर, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर, लक्ष्मी मुरावत (३०) या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी रामू किसन चव्हाण आणि दशरथ किसन चव्हाण या दोन भावांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदन हे गवंडी असून, फरशी बसविण्याचे कामे करतात. तर आरोपी हे त्यांच्याच नात्यातील आहेत. दरम्यान ३ लाखांच्या भिशीवरून त्यांच्यात वाद होते. चंदन हे भिशीचे ३ लाख रुपये घरी येऊन मागत होते. या रागातून सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दोघेजण हातात सत्तूर घेऊन चंदन याच्या घरात शिरले. त्याची पत्नी लक्ष्मीही यावेळी घरात होती. पैसे मागायला येतो का, असे म्हणत वाद घालून दोघांनी मानेवर तसेच डोक्यात आणि पोटावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. पत्नी लक्ष्मी यांनी आरडा ओरडा सुरू करून वाचवा वाचवा असे, मोठ,-मोठ्याने ओरडू लागल्या. त्यांनी आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्या जखमी झाल्या. अचानक गोंधळ झाल्याने नागरिकांनी धाव घेतली. चंदन हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. नागरिकांनी दोघा मारेकरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकच जण त्यांच्या हाती लागला. दुसरा तेथून पसार झाला. नागरिकांनी चोप देऊन घटनेची माहिती पोलिसांना दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.