Thu, Sep 24, 2020 16:45होमपेज › Pune › रेशीमगाठीत अडकताच त्यांनी केला अवयवदानाचा संकल्प

रेशीमगाठीत अडकताच त्यांनी केला अवयवदानाचा संकल्प

Published On: Dec 25 2017 10:24PM | Last Updated: Dec 25 2017 10:24PM

बुकमार्क करा

पुणेः प्रतिनिधी

‘तो’ आणि ‘ती’ दोघेही डॉक्टर... रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या दुःखांशी दररोज येणारा संबंध... यातुनच समाजात अवयवदानाबाबत जागृती करण्यासाठी लग्नाच्या दिवशीच नवदांपत्यांनी अवयवदानाचा संकल्प करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. 

डॉ. प्रतीक राउत आणि त्यांच्या पत्नी डॉ. उत्तरा देशपांडे असे या दांपत्याचे नाव आहे. डॉ. प्रतीक हे चेह-याची शस्त्रक्रिया करणारे शल्यचिकित्सक (मॅक्सिलोफेसियल सर्जन)  तर डॉ. उत्तरा या न्यायवैद्यकशास्त्र दंतवैद्यतज्ज्ञ (फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजिस्ट). हे दांपत्य रविवारी (24 डिसेंबर) हडपसर येथे विवाहबध्द झाले. अवयव नसल्यामुळे वाया जाणारे अवयव व ते पाहिजे असणा-यांची वाढती यादी. मग, जागृती करायची मग स्वतः पासूनच का नाही असा विचार करत त्यांनी लग्नाच्या रेशीमगाठी बांधतानाच अवयवदान करण्याचा फॉर्मही भरला. या दांपत्याने लग्नातच अवयवदानाचा फॉर्म भरण्याचा संकल्प केला आणि तो तडीसही नेला. तसेच त्यांनी भाषण करून अवयवदानाचे महत्वदेखील पटवून दिले.  

याविषयी बोलताना डॉ. प्रतीक म्हणाले, “आम्ही स्वतः डॉक्टर असल्याने अवयव निकामी झालेल्या रुग्णांचे दुख व त्याअभावी ते दगावल्याचे पाहतो. अवयवदान जागृती नसल्याने अवयवद हवे असलेल्यांची यादी वाढत आहे. लग्नात किमान एक हजार पाहुने असतात त्यांच्यापर्यंत हा विचार पोचला जाईल म्हणून हा अवयवदानाचा फॉर्म आम्ही भरून दिला.’’ या विवाह सोहळयात ‘रि बर्थ’ या अवयवदानावर जागृती करणा-या स्वयंसेवी संस्थेने अवयवदान फॉर्मची व्यवस्था केली होती. या दांपत्यांमुळे आणखी 25 ते 30 पाहुन्यांनीदेखील हे फॉर्म भरून दिले आहेत. एका दांपत्याने विवाहसोहळयात अवयवदानाचा फॉर्म भरून देण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ असल्याची माहिती ‘रि बर्थ’संस्थेचे अध्यक्ष राजेश शेटटी यांनी दिली.