Fri, Jul 03, 2020 04:10होमपेज › Pune › मान्सून केरळमध्ये २ जूनला दाखल होण्याची शक्यता! 

मान्सून केरळमध्ये २ जूनला दाखल होणार?

Last Updated: May 25 2020 9:02PM

file photoपुणे : पुढारी वृत्तसेवा

अम्फान महाचक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरातील काही भागासह अंदमान आणि निकोबार बेटांवर थांबलेला नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) आता पुन्हा एकदा जोमाने पुढील वाटचाल करणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यानुसार २७ मे पर्यंत मान्सून बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम, मध्यवर्ती भागासह अंदमान समुद्रात दाखल होईल. असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, अनुकूल स्थितीमुळे केरळमध्ये 5 ऐवजी 2 जून रोजीच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. अनुकूल स्थितीमुळे यावर्षी बंगालच्या उपसागरासह अंदमान आणि निकोबार बेटांवर 16 मे ला मान्सून दाखल झाला होता. सरासरीपेक्षा दोन ते तीन दिवस आधीच मान्सून या भागात दाखल झाल्यामुळे केरळपर्यंत मान्सून 30 मे च्या आसपास पोहचेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला होता. मात्र, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अम्फान महाचक्रीवादळाने पश्चिम बंगाल, बांगला देश, ते अगदी ओडिशापर्यत जोरदार धडक मारली. या चक्रीवादळाने हवेतील आर्द्रता पूर्णपणे शोषून घेतली. परिणामी मान्सूनचा प्रवास मंदावला आणि अंदमान, निकोबार बेटांवरच थांबला. 

दरम्यान, महाचक्रीवादळ सहा दिवसांपूर्वीच शमले आणि आता पुन्हा एकदा मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक असलेले वातावरण तयार झाले आहे. परिणामी 27 मे पर्यत मध्य आणि दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरासह अंदमान समुद्र आणि आसपासच्या भागात मान्सून दाखल होणार आहे. सध्या बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम भागापासून ते दक्षिण तामिळनाडूपर्यत हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती तयार झाली आहे.

मान्सूच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण 

मान्सूनच्या प्रवासात महाचक्रीवादळाचा अडसर आल्यामुळे प्रगती मंदावली होती. आता मात्र, स्थिती अनुकूल तयार झाली आहे. त्यामुळे मान्सूनची आगेकूच होण्यास वातावरण चांगले आहे. किंबहुना केरळमध्ये देखील मान्सून वेळेच्या आधीच दाखल होण्याची शक्यता आहे.
- अनुपम कश्यपि- हवामान प्रमुख- पुणे वेधशाळा