Mon, Aug 03, 2020 15:18होमपेज › Pune › इंद्रायणी घाटावर अडकले ३०० लोक

इंद्रायणी घाटावर अडकले ३०० लोक

Last Updated: Mar 26 2020 10:21AM
अन्नाअभावी उपासमारीची वेळ, पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीकाठाने दररोजची धाव; संचारबंदी लागू झाल्याने गावाला जाता येईना

आळंदी : श्रीकांत बोरावके 

'हे विश्वची माझे घर' म्हणणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत पोट भरण्यासाठी आलेल्या वीस ते तीस वयातील तरुणांवर, घरातून हाकलून दिलेल्या ज्येष्ठांवर अन्नाअभावी उपासमारीचे वेळ आली असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू झाल्याने इंद्रायणी घाटावर अंदाजे दोनशे ते तीनशे लोक अडकले आहेत. ना घर ना घाट अशी अवस्था झाल्याने दिवसभर पोलिसांपासून वाचण्यासाठी लोक नदी काठाने सिद्धबेट आणि चऱ्होलीकडे पळत असून काठावरील झाडाखाली दिवसभर उपाशी पोटी झोपत आहेत. 

रविवारी ( दि.२२) जनता कर्फ्यू लागला, त्यादिवशी या लोकांनी अंदाज बांधून सोमवारी गाव गाठण्याचे ठरविले होते. मात्र, सोमवारी दुपारीच संचार बंदी लागू झाल्यामुळे हे लोक अडकून पडले. या लोकांमध्ये काही कामगार आहेत जे आळंदीत रोज मजुरी करून पैसे कमावतात. गुजराण करणारे कोणी घरातून पळून आलेले आहेत तर काहींना घरातून बाहेर काढण्यात आले आहे. काहींना ना घर आहे ना कसला ठाव-ठिकाणा. परंतु, आता त्यांचा निवारा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

याबाबत दै. पुढारीच्या प्रतिनिधीने या अडकलेल्या लोकांशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही मदत मागण्यास गेल्यास पोलिस आम्हाला गुन्हेगार समजून मारतील आणि हाकलून देतील, असे आम्हाला वाटते. मजुरी करून कमावलेले पैसे होते, तेव्हा आम्ही धर्मशाळांमध्ये झोपायचो. आता पैसे नाहीत. धर्मशाळादेखील पुढे येत नाही. विनंती करूनदेखील कोणी आश्रय देत नाही. हॉटेल, मंदिरे, कार्यालये बंद असल्याने जेवणदेखील मिळत नसून जे लोक घाटावर अन्न वाटप करत होते, ते देखील आता यायचे बंद झाले आहेत. पोलिसदेखील घाटावर बसू देत नाहीत. मग सांगा आम्ही जगायचं कसं? असा सवाल लोक उपस्थित करत आहेत.

एकंदरीतच घाटावर अडकलेल्या लोकांना गर्दी नको म्हणून केवळ हाकलून न देता पोलिसांनी आणि प्रशासनाने त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्याची वा त्यांची काही दिवस राहण्याची, जेवणाची आळंदीत सोय करावी, अशी मागणी होत आहे.

उपासमारीने एकाचा मृत्यू?

आळंदीत अन्नाअभावी भिक्षेकरी लोकांचे हाल होत असून घाटावर अडकलेल्या लोकांचीदेखील हीच अवस्था आहे. शहरात दोन दिवसांपूर्वी आढळलेला साठ वर्षीय अनोळखी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू उपासमारीने झाल्याचे येथील लोक सांगत आहेत.

या लोकांना तुमचे गाव कोणते, तुम्हाला कुठे सोडण्याची सोय करायची का? असे विचारले होते. मात्र, त्यांनी इंद्रायणी घाट हेच आमचे गाव म्हणत उत्तरे देणे टाळली. अशा अडकलेल्या लोकांबाबत जिल्हा प्रशासनाने निर्देश दिल्यास आम्ही त्यानुसार कारवाई करू. आळंदीतील धर्मशाळा, शाळांनी त्यांना राहण्यास जागा उपलब्ध केल्यास आम्ही त्यांना अन्न पॅकेट देऊ.

  - रविंद्र चौधर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आळंदी पोलिस स्टेशन

येत्या दोन दिवसांत या लोकांबाबत काय उपाय करता येतील. त्यांना अन्न आणि राहण्याची व्यवस्था करता येईल का? याबाबत वरिष्ठांशी बोलून येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ. या लोकांच्या संख्येचा निश्चित आकडा उपलब्ध नसल्याने उपाययोजना ठरवतानादेखील अडचणी निर्माण होणार आहेत. मात्र त्यावर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.

  - समीर भूमकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद