Thu, Jan 21, 2021 00:41होमपेज › Pune › माजी शिक्षण उपसंचालकासह 28 जणांवर गुन्हा

माजी शिक्षण उपसंचालकासह 28 जणांवर गुन्हा

Last Updated: Oct 21 2019 1:36AM
पुणे : 

पूर्वनियोजित कट रचून बेकायदेशीर शिक्षक भरती करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, मनपाच्या प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत, तत्कालीन शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख, दत्तात्रय शेंडकर, पिंपरी-चिंचवड प्रशासकीय अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, शिक्षक नेता व मुख्याध्यापक संभाजी शिरसाठ यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी विस्तार अधिकारी किसन भुजबळ (वय 50, रा. चंदननगर) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 120 (ब), 109, 186, 201, 409, 420, 465, 467, 468, 471 सह 34 व भ—ष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किसन भुजबळ हे पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात नोकरीस आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील काही शिक्षक भरती व तुकडी मान्यतेबाबत चौकशी सुरू होती. किसन भुजबळ हे या प्रकरणाची चौकशी करीत होते. त्यांनी धनकवडी येथील प्रेरणा शिक्षण संस्था व प्रेरणा प्राथमिक विद्यालयाची चौकशी केली. या संस्थेचा 2012 मध्ये शासन तसेच शिक्षण विभागाकडे शिक्षक मान्यतेचा कोणताही प्रस्ताव नव्हता. मात्र, तरीही रामचंद्र जाधव व संभाजी शिरसाठ आणि अर्जुन नावाच्या व्यक्‍तीने पूर्वनियोजित कट रचून, जाधव हे त्या वेळी पदावर नसतानाही  खोटे व बनावट कागदपत्र तयार केले व दोन शिक्षक भरती केल्याचे व शिक्षक नियुक्‍तीचे आणि मान्यतेचे आदेश 2012 मधील दिनांक टाकून 2019 मध्ये काढले गेल्याचे समोर आले आहे.

त्यानंतर संभाजी शिरसाठ यांनी या संस्थेचा बनावट लेटरहेड तयार करून ते अर्जुन नावाच्या व्यक्‍तीकडे दिले. हा व्यक्‍ती या संस्थेत आला. त्याने संस्थेच्या अध्यक्षांवर दबाव टाकून स्वाक्षर्‍या व शिक्के घेतले. संस्थेच्या लिपिकावरही दबाव टाकून त्यावर जावक क्रमांक घेतला. त्यामुळे ते पत्र संस्थेने पाठविले असल्यासारखे भासविण्यात आले. या पत्रावर जाधव यांनी ’सादर करावे’ असा शेरा मारला. तसेच, दिनांक 9/7 टाकून 2019 मध्ये 2012 मधील तारीख टाकून बनावट आदेश टाकला. या सर्व प्रकरणात जाधव व संभाजी शिरसाठ या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर, यानंतर संस्थेच्या अध्यक्षा आणि मुख्याध्यापकांना या दोन शिक्षकांना शाळेत रूजू करून घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यांनी नकार दिल्यानंतर प्रशासकीय अधिकारी मिनाक्षी राऊत यांनी पदाचा गैरवापर करून या संस्थेवर दबाव टाकला. त्यांचे अधिकारी काढून घेतले. तसेच, संस्थेची चौकशी करू, असे धमकावत त्यांना या शिक्षकांना रूजू करून घेण्यास भाग पाडले, असे या फिर्यादीत म्हटले आहे. संस्थेने राज्याच्या शिक्षण आयुक्‍तांकडे तक्रार केली होती. त्यानुसार या तक्रारींची चौकशी फिर्यादींनी केली.

याप्रमाणेच जाधव, शिरसाठ, मिनाक्षी राऊत आणि इतर 28 जणांनी, आणखी पाच संस्थेत तुकड्यांची बेकायदेशीर मंजुरी व बेकायदा शिक्षक भरती केल्याचे या चौकशीतून समोर आले आहे. त्यांनी अशाप्रकारे जवळपास शासनाची 2 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तर, या शिक्षकांकडून लाखो रुपये घेतल्याचेही शक्यता असल्याचे म्हटले आहे. 

20 शाळांची चौकशी सुरू

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील आणखी 20 शाळांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये शासनाची जवळपास 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याची शक्यता असल्याचे फिर्यादींनी म्हटले आहे. त्यामुळे या शिक्षक भरतीचा मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात असून, त्यात आणखी काही लोकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. संगनमताने हे सुरू असल्याने भीतीपोटी कोणी तक्रार करीत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

संभाजी शिरसाठ कोट्यधीश

शिक्षक भरती घोटाळ्यात मुख्य भूमिका ही संभाजी शिरसाठ यांची आहे. शिरसाठ हा आकुर्डी येथील एका शाळेत मुख्याध्यापक असून, तो शिक्षक संघटनेचा नेता आहे. 2014 मध्ये शिरसाठ हा भाड्याच्या खोलीत राहत होता. आता शिरसाठ याच्याकडे इंदापूर येथे 15 एकर जमीन, चिखली येथे 1 कोटी रुपयांची जमीन, पत्नीच्या नावाने काढलेल्या ट्रस्टच्या नावे जमीन व मोशी प्राधिकरणात 2 कोटी रुपयांचा बंगला, दुकाने, अलीशान गाड्या असल्याचेही पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यासोबतच त्याने अन्य व्यक्‍तींच्या नावेही जमीन घेतली असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.